मॉस्को : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायनेल मेसी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषकातून अर्जेंटिनाला बाहेरचा रस्ता धरावा लागल्यास मेसी तात्काळ निवृत्ती जाहीर करेल, असा दावा मेसीचा माजी सहकारी पाबलो झाब्लेटाने केला आहे.


झाब्लेटा हा 2014 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या अर्जेंटिना संघाचा भाग होता. 'अर्जेंटिनासाठी विजय मिळवून देण्याची मेसीकडे शेवटची संधी होती. ती हुकल्यास मला मेसीसाठी नक्कीच वाईट वाटेल' असं झाब्लेटा म्हणतो.

फिफा विश्वचषकात गुरुवारी क्रोएशियाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाला 3-0 ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दोन वेळ विजेत्या संघाचं आव्हान बाद फेरीपूर्वीच संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे मेसी रिटायरमेंटचा निर्णय लवकर जाहीर करु शकतो.
FIFA World Cup 2018 : मेसीच्या अर्जेंटिनाचा क्रोएशियाकडून धुव्वा, 3-0 ने मात

'कतारमधील फिफा विश्वचषकापर्यंत चार वर्षांचा कालावधी फार दीर्घ आहे. चाहत्यांमध्येही नाराजी आहे. खेळाडूंकडून चाहत्यांना जरा जास्तच अपेक्षा असतात' असं झाब्लेटाला म्हणतो.

मेसीची कारकीर्द

लायनेल मेसी 24 जून रोजी वयाची 31 वर्ष पूर्ण करत आहे. 2001 पासून मेसी बार्सिलोना संघासाठी फॉरवर्ड पोझिशनला खेळतो. गेल्या 17 वर्षांत त्याने संघासाठी 32 ट्रॉफी पटकावल्या आहेत. मेसी हा सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो.
लायनेल मेसी... फुटबॉलच्या दुनियेचा नायक

2005 मध्ये सिनिअर संघात पदार्पण केल्यानंतर मेसी फिफा विश्वचषकात (2006) खेळणारा अर्जेंटिनाचा सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला होता.

लायनेल मेसीनं आजवरच्या कारकीर्दीत एफसी बार्सिलोनाकडून खेळताना चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदावर चार वेळा आणि ला लिगाच्या विजेतेपदावर नऊ वेळा नाव कोरलं आहे. त्याच मेसीला अर्जेंटिनाकडून खेळताना एकही प्रतिष्ठेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही.

मारियो केम्पसच्या अर्जेंटिनानं 1978 साली, तर दियागो मॅराडोनाच्या अर्जेंटिनानं 1986 साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्या दोघांच्या तुलनेत अधिक लोकप्रियता लाभलेल्या मेसीला विश्वचषक काही जिंकता आलेला नाही.

2006 आणि 2010 सालच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या विश्वचषकात अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

कोपा अमेरिकातही अर्जेंटिनाला गेल्या पंचवीस वर्षांत चार उपविजेतीपदांपलिकडे मजल मारता आलेली नाही. त्यापैकी 2007, 2015 आणि 2016 साली मेसीला कोपा अमेरिकाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

2016 मध्ये मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र आपला निर्णय मागे घेत त्याने 2018 च्या फिफा विश्वचषकात पुन्हा संघाचं नेतृत्व केलं.