सचिन तेंडुलकरने ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करत, अरमानचे आभार मानले असून, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सचिनने शुभेच्छा दिल्या.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. अगदी नुकतंच कळायला लागलेल्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. तेही जीव ओवाळून टाकतील, असे चाहते. त्यापैकीच एका चिमुकल्या चाहत्याने सचिनला खास पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘डिअर अंकल सचिन...’ अशी सुरुवात करत सचिनच्या या चिमुकल्या फॅनने पत्र लिहिलं आहे. अरमान असे या फॅनचे नाव आहे. सचिनसारखंच आपल्यालाही व्हायचं असल्याचे अरमानने म्हटले आहे. अरमानने हस्ताक्षरात हे पत्र लिहिले. सचिन तेंडुलकरने ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करत, अरमानचे आभार मानले असून, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सचिनने शुभेच्छा दिल्या. अरमानने सचिनला उद्देशून लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? “डिअर अंकल सचिन, मी तुझा सिनेमा (सचिन : अ बिलिअन ड्रीम्स) पाहिला आणि मी खूप एन्जॉय केला. मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे. मला तुझ्यासारखं व्हायचंआहे. मला तुझ्यासारखं खेळून देशासाठी चषक जिंकायचं आहे. तुझी स्वाक्षरी असलेली बॅट मला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. तू दिलेलं बक्षीस माझ्यासाठी अत्यंत मोलाचं आहे.”, असे अरमानने पत्रात म्हटले आहे.