पॅरिस: पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसह युरोप खंडातील सारे फुटबॉल स्टार्स सध्या फ्रान्सच्या भूमीवर उतरले आहेत. निमित्त आहे युरो दोन हजार सोळाचं. युरो दोन हजार सोळा म्हणजे युरोपियन फुटबॉलमधली सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा.

 

युरोपियन विजेतेपदाच्या या स्पर्धेचं 1984 साली फ्रान्समध्ये आयोजन करण्यात आलं. त्या वेळी त्यात केवळ आठ देशांचा समावेश होता. आज 32 वर्षांनी पुन्हा फ्रान्समध्ये होत असलेल्या युरो कप फुटबॉलमध्ये 24 देशांचा समावेश आहे. या स्पर्धेतल्या सामन्यांना उद्यापासून सुरुवात होत आहे.

 

युरो कपच्या सलामीच्या साखळी सामन्यात फ्रान्सचा मुकाबला रुमेनियाशी होईल. फ्रान्स आणि रुमेनिया या दोन्ही संघांचा अ गटात समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात पॅरिसवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, युरो कपवरही दहशतवादाचं सावट आहे. 13 नोव्हेंबरला पॅरिसमध्ये फ्रान्स-जर्मनी सामना सुरू असताना, आत्मघातकी दहशतवाद्यांनी स्टेड द फ्रान्स स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्या बॉम्बस्फोटांमध्ये 130 जणांचा मृत्यू झाला होता.