नवी दिल्ली : कोरोना संकटानंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेत इंग्लंडनं सरशी साधली. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 269 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली.


या सामन्यात इंग्लंडनं विंडिजसमोर 399 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा दुसरा डाव 129 धावातच आटोपला. ब्रॉडनं पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात विंडीजच्या चार फलंदाजांना माघारी धाडून इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर वोक्सनं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या.


त्याआधी इंग्लंडनं पहिल्या डावात 369 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 197 धावात गुंडाळून 172 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही इंग्लिश फलंदाजांनी शानदार फलंदाजी करताना दोन बाद 226 धावांवर आपला डाव घोषित केला. इंग्लंडच्या या डावात सलामीच्या डॉमनिक सिबले (56) आणि रोरी बर्न्स (90) यांच्यासह कर्णधार ज्यो रुटनंही (68) अर्धशतक झळकावलं. त्यामुळे इंग्लंडला 398 धावांची भक्कम आघाडी घेता आली.


ब्रॉडच्या कसोटीत 500 विकेट्स पूर्ण


मॅन्चेस्टर कसोटीत वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनं कसोटी कारकीर्दीत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. दुसऱ्या डावात विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत ब्रॉडनं 500 विकेट्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा ब्रॉड हा जगातला सातवा तर जेम्स अँडरसननंतर इंग्लंडचा दुसराच गोलंदाज ठरला. ब्रॉडनं आतापर्यंत 140 कसोटी सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधीत्व करताना 28 च्या सरासरीनं 501 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.


500 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज


मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800


शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708


अनिल कुंबळे (भारत) – 619


जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 589*


ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563


कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519


स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 501


विंडीजचं मालिकाविजयाचं स्वप्न अधुरं


जेसन होल्डरच्या विंडीज संघानं साऊदम्प्टनची पहिली कसोटी जिंकून इंग्लंडचा धक्का दिला होता. 1988 नंतर विंडीजला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. त्यामुळे पहिल्या कसोटी विजयानंतर विंडीज चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण इंग्लंडनं मॅन्चेस्टरमध्ये खेळवण्यात आलेल्या लागोपाठच्या दोन्ही कसोटी जिंकून विंडीजला ऐतिहासिक मालिकाविजयापासून दूर ठेवलं.


बायो सिक्युअर वातावरणात खेळवण्यात आलेली पहिली मालिका


कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत सुरक्षित वातावरणात अर्थात बायो सिक्युअर वातावरणात ही मालिका यशस्वीरित्या खेळवण्यात आली. दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवण्याची मुभा नव्हती. त्यांच्या वेळोवेळी तपासण्याही घेण्यात येत होत्या. अशा रितीनं या मालिकेचं यशस्वी आयोजन करुन इंग्लंड क्रिकेट बोर्डानं इतर देशांसमोर एक नवा पायंडा घालून दिला.