विश्वचषकानंतर विश्वविजेत्या इंग्लंडला आयर्लंडचा दणका, अवघ्या 85 धावांत गुंडाळले
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2019 07:27 PM (IST)
इंग्लंडने याच लॉर्ड्स मैदानावर दहा दिवसांपूर्वी विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व विजयानंतर याच मैदानावर आयर्लंडसारख्या दुबळ्या संघापुढे कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजीची दाणादाण उडाली आहे.
लॉर्ड्स : विश्वचषकानंतर विश्वविजेत्या इंग्लंडला आयर्लंडच्या संघाने चांगलाच दणका दिला आहे. ज्या लॉर्ड्सवर काही दिवसांपूर्वी विश्वचषक हाती घेतला त्याच लॉर्ड्सवर आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडची दाणादाण उडाली आहे. आयर्लंडने इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या 85 धावांत गुंडाळले आहे. आयर्लंडच्या वेगवान गोलंदाज टीम मुर्तागने भेदक मारा करत 13 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स इंग्लंड संघाची दाणादाण उडवली आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर जेसन रॉय (05) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारा जोए डेन्ली (23) झटपट माघारी परतले. पाठोपाठ रोरी बर्न्स (06) माघारी परतला. टीम मुर्तागने सुरुवातीच्याच षटकांमध्ये यजमान इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीने पुरती निराशा केली. कर्णधार जो रुटसह जॉनी बेअरस्टो, मोईन अली आणि ख्रिस वोक्सदेखील सपशेल अपयशी ठरले. 50 धावा करण्याच्या आधीच इंग्लंडचे 7 फलंदाज माघारी परतले. तळातल्या फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत इंग्लंडला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला. सॅम करन आणि ओली स्टोन्स यांनी इंग्लंडच्या संघाला 85 धावांपर्यंत मजल मारुन दिली. आयर्लंडकडून टीम मुर्ताघने 5, मार्क आदीरने 3 तर बॉय रॅनकिनने 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने याच लॉर्ड्स मैदानावर दहा दिवसांपूर्वी विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व विजयानंतर याच मैदानावर आयर्लंडसारख्या दुबळ्या संघापुढे कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजीची दाणादाण उडाली आहे.