नॉटिंगॅहम : जबरदस्त फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टो (139) आणि अॅलेक्स हेल्स (147) यांच्यानंतर आलेल्या कर्णधार इयॉन मॉर्गनच्या वादळानंतर इंग्लंडने वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी धावसंख्या उभारली. वन डे क्रिकेटमधला याआधीचा उच्चांक (444) इंग्लंडच्याच नावावर होता.

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात सहा बाद 481 धावा केल्या. यापूर्वी इंग्लंडने 2016 साली पाकिस्तानविरुद्ध तीन बाद 444 धावांची मजल मारली होती. यावेळी इंग्लंडने स्वतःचाच विक्रम मोडित काढत नवी धावसंख्या उभारली.

सलामीला उतरलेल्या बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी 19.3 षटकांमध्येच 159 धावांची भागीदारी केली. 61 चेंडूत 82 धावांवर जेसन रॉय धावबाद झाला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीला पुढे नेण्यासाठी बेअरस्टोला हेल्सने साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी करत 35 षटकांमध्येच 300 धावांची मजल मारुन दिली.

अॅश्टन एगरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी बेअरस्टोने 92 चेंडूत 15 चौकार आणि पाच षटकारांनी त्याची खेळी सजवली होती. बेअरस्टोनंतर बटलर (11) स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन मैदानात उतरला. येताच त्याने धमाका सुरु केला. 43 धावांवर पोहोचताच मॉर्गन इंग्लंडचा वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सध्या संघातून बाहेर असलेल्या इयान बेलच्या 5416 धावांना मागे टाकलं.

पहिला विक्रम मोडताच मॉर्गनची नजर दुसऱ्या विक्रमावर होती. त्याने 21 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडचा सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. मॉर्गन आणि हेल्सने चौथ्या विकेटसाठी 10 षटकात 124 धावा ठोकल्या.

दरम्यान, पाच सामन्यांच्या या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाने अगोदरच दोन सामने गमावलेले आहेत.