कोलकाता : इंग्लंड आणि स्पेन याच दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार आहे फिफा अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाचा अंतिम सामना. या पार्श्वभूमीवर कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर इंग्लंड आणि स्पेन हे दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत.
अंडर सेव्हन्टिन विश्वचषकात इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही दोन्ही संघांची विजेतेपदाची पाटी अद्यापही कोरीच आहे. विश्वचषकाच्या 32 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडनं यावेळी पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
स्पेनची मात्र विश्वचषकात दाखल होण्याची ही तब्बल चौथी वेळ आहे. 1991, 2003 आणि 2007 साली स्पेननं अंतिम फेरी गाठली होती. दुर्दैवानं तिन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होत. त्यामुळे यावेळी दोन्ही संघात पहिल्या विजेतेपदासाठीचा संघर्ष फुटबॉल रसिकांना पहायला मिळेल.
इंग्लंडनं यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. साखळी फेरीत ‘फ’ गटात चिली, मेक्सिको, इराक या संघावर मात करत इंग्लंड संघ अव्वल स्थानी राहिला.
उपउपांत्यपूर्व फेरीत जपानविरूद्ध गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यात पेनल्टीवर 5-0 असा विजय मिळवला. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेचा 4-1 आणि उपांत्य सामन्यात ब्राझीलचा 3-1 असा धुव्वा उडवत इंग्लंडनं दिमाखात अंतिम फेरी गाठली.
स्पेनच्या कामगिरीवर नजर टाकल्यास साखळी फेरीत ब्राझीलविरूद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता स्पेननं या विश्वचषकातील सर्व सामने जिंकलेले आहेत. बाद फेरीत फ्रान्स, इराक, माली या संघांना पराभवाची धूळ चारत स्पेननं चौथ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही संघांच्या यंदाच्या विश्वचषकातील कामगिरीची तुलना करता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. इंग्लंडनं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. हे सर्व सामने जिंकताना इंग्लंडच्या खेळाडूंनी तब्बल 18 गोल झळकावले आहेत. तर स्पेननं सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकत 14 गोल्सची नोंद केली आहे.
इंग्लंडच्या प्रभावी कामगिरीत स्ट्रायकर रियान ब्रेव्हस्टर महत्वाचा शिलेदार ठरला. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत सर्वाधिक 7 गोल झळकावले आहेत. त्यात उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं अमेरीका आणि उपांत्य सामन्यात तीन वेळच्या विजेत्या ब्राझीलविरूद्ध केलेल्या हॅट्रिकचा समावेश आहे.
स्पेनच्या अबेल रूईझची कामगिरीही वाखाणण्याजोगी आहे. त्यानं या विश्वचषकात 6 सामन्यांमध्ये 6 गोल झळकावले आहेत. तर स्पेनच्याच सर्जिओ गोमेझ, सीझर गेलाबर्ट, फेरान टॉरेस यांनीही स्पेनच्या कामगिरीत मोलाची भूमिका बजावली आहे.
एकंदरित या युवा खेळाडूंकडून दोन्ही संघांना अंतिम सामन्यातदेखील याच प्रभावी कामगिरीची अपेक्षा राहील. त्यामुळे कोलकत्याच्या सॉल्ट लेक मैदानावर 2017च्या फिफा अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाच्या विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
अंडर-17 फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि स्पेन भिडणार
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
26 Oct 2017 11:43 PM (IST)
अंडर सेव्हन्टिन विश्वचषकात इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही दोन्ही संघांची विजेतेपदाची पाटी अद्यापही कोरीच आहे. विश्वचषकाच्या 32 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडनं यावेळी पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -