लंडन : भारताचा जलद गोलंदाज ईशांत शर्मा इंग्लंडमध्ये नवा विक्रम करण्यापासून एक पाऊल दूर आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडण्याचं आव्हान ईशांत शर्मासमोर असणार आहे.


इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ईशांतने 250 विकेट्सचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये 250हून अधिक विकेट्स घेणारा ईशांत भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. ईशांत शर्माने 86 कसोटी सामन्यात 253 विकेट घेतल्या आहेत.


इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यात सात डावांत इशांतने 15 विकेट घेतल्या आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ईशांतने चार विकेट घेतल्यास इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरणार आहे. सध्या हा विक्रम कपिल देव यांच्या नावे आहे.


कसोटी क्रिकेट गाजवलेल्या कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये 13 कसोटी सामन्यात 43 विकेट्स घेतल्या आहेत. तर ईशांतने इंग्लंडमध्ये खेळलेल्या 11 सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे ईशांत इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चार विकेट्स घेऊन कपिल देव यांच्या नावे असलेल्या विक्रमाला गवसणी घालणार का? हे पाहावं लागेल.