धुती चंदचा विक्रम
राष्ट्रीय विक्रम रचणारी दुती चंदने बुधवारी (10 जुलै) नवा विक्रम आपल्या नावावर जमा केला. इटलीत सुरु असलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर शर्यत केवळ 11.32 सेकंदात पूर्ण करुन तिने सुवर्ण पदकाची कमाई केली. यासोबतच वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला धावपटू बनली आहे.
स्वित्झर्लंड, जर्मनीच्या धावपटूंना मागे सोडलं
23 वर्षीय दुती चंदने इटलीतील ही 100 मीटर धावण्याची शर्यत 11.32 सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या प्रकारात स्वित्झर्लंडच्या डेल पाँटेने 11.33 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर जर्मनीच्या लिसा क्वेईने 11.39 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळवलं.
जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारी दुसरी महिला धावपटू
जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी दुती चंद ही हिमा दासनंतर दुसरी धावपटू आहे. हिमाने मागील वर्ल्ड ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर दुती चंजने 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर शर्यतीत प्रत्येकी एक रौप्यपदक मिळवलं होतं.
राष्ट्रपती, पंतप्रधान, क्रीडा मंत्र्यांकडून अभिनंदन
दुती चंदच्या या कामगिरीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजिजू, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी तिचं अभिनंदन केलं. यानंतर दुतीनेही सगळ्यांचे आभार मानत रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट करत सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रयत्न करेन, असं सांगितलं.