मुंबई:  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियानं धरमशाला वन डेत श्रीलंकेसमोर सपशेल लोटांगण घातलं. श्रीलंकेनं टीम इंडियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.


या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी अवघं ११३ धावांचं लक्ष्य होतं. श्रीलंकेनं अवघ्या तीन विकेट्सच्या मोबदल्यात ते आव्हान पार केलं. त्यात सलामीच्या उपुल थरंगाचा ४९ धावांचा वाटा मोलाचा ठरला. अँजलो मॅथ्यूज २५, तर निरोशन डिकवेला २६ धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा ११२ धावांत खुर्दा उडवला. या सामन्यात भारताचे पहिले सात फलंदाज २९ धावांत माघारी परतले होते. त्या परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीनं एक खिंड लढवून भारतीय संघावर नीचांकाची लाजिरवाणी वेळ येऊ दिली नाही. त्यानं १० चौकार आणि दोन षटकारांसह ६५ धावांची खेळी उभारली.

दिनेश कार्तिकचा लाजिरवाणा विक्रम

दरम्यान या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने, लाजिरवाणा विक्रम स्वत:च्या नावे केला.

कार्तिकने तब्बल 18 चेंडून खेळून काढले, यादरम्यान त्याने एकही धाव केली नाही. तो शून्यावर बाद झाला.

तब्बल 18 चेंडू खेळूनही, एकही धाव न करणारा कार्तिक पहिला भारतीय फलंदाज ठरला.

कार्तिकपूर्वी हा नकोसा वाटणारा विक्रम एकनाथ सोलकर यांच्या नावे होता.



सोलकर यांनी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 17 चेंडू खेळून, एकही धाव न करता शून्यावर बाद झाले होते.

सोलकर हे अष्टपैलू होते. ते एक उत्तम फलंदाज आणि डावखुरे फिरकीपटू होते.