दुबई : श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल, प्रशिक्षक चंडीका हथरुसिंघे आणि संघ व्यवस्थापक अशनका गुरुसिन्हा यांच्यावर आयसीसीने चार एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची बंदी घातली आहे. सोमवारी आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीच्या चौकशी समितीने या तिघांवर ही कारवाई केली आहे.
आयसीसीने म्हटलं की, 'स्वतंत्र चौकशी समितीचे अध्यक्ष मायकल बेलोफ यांनी श्रीलंका संघाचा कर्णधार दिनेश चंडिमल, प्रशिक्षक चंडिगा हाथरुसिंघा आणि संघ व्यवस्थापक असंका गुरुसिंहा यांच्या खात्यात आठ नकारात्मक अंक टाकले आहेत. याचा अर्थ या तिघांना चार एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात येत आहे.'
आयसीसीच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिघेही दोषी आढळले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यात सेंट लुसिया येथील कसोटी सामन्यात चंडिमलवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंनी कोणतीही चुकीची गोष्ट केली नसल्याचं म्हटलं होतं. या प्रकारानंतर श्रीलंकेच्या खेळाडुंनी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतल्याने सामना दोन तास उशीरा सुरू झाला होता.
सामना अधिकारी जवागल श्रीनाथ यांनी मध्यस्थी केल्यानंतर सामना सुरु झाला. सामना उशीरा सुरू झाल्यामुळे पंचांनी वेस्ट इंडिजच्या संघाला 5 धावा बहाल केल्या. श्रीनाथ यांच्यासमोर झालेल्या सुनावणीतही चंडिमलवर एका सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.