सामन्यातील 18 षटकामुळे सामन्याला कलाटणी मिळाली आणि मुंबईनं सामना आपल्या बाजूनं झुकवला. आणि इथंच बंगळुरु आयपीएलच्या या मौसमातून बाहेर पडणार हे निश्चित झालं.
18व्या ओव्हरपर्यंत बंगळुरुनं सामन्यावर आपली पकड ठेवली होती. पण एबी डिव्हिलियर्सच्या एका सल्लानं बंगळुरुला सामना गमवावा लागला.
याचा खुलासा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अनिकेत चौधरीनं केला. अनिकेतनं सांगितलं की, 'डिव्हिलिअर्सनं मला बाउंसर टाकायला सांगितला. मी देखील बाउंसर टाकला. पण त्यावर हार्दिक पांड्यानं षटकार ठोकला आणि सामना मुंबईच्या बाजूनं झुकला.'
18वी ओव्हर टाकण्यासाठी आलेला अनिकेतनं चांगली बॉलिंग करत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. सुरुवातीच्या पाच चेंडूमध्ये एकही मोठा फटका त्यांना खेळता आला नव्हता. पण शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी अनिकेतनं एबी डिव्हिलिअर्सकडे सल्ला मागितला की, मी शेवटचा चेंडू कसा टाकू? तेव्हा डिव्हिलिअर्सनं बाउंसर टाकण्याचा सल्ला त्याला दिला. त्याआधी अनिकेतनं पाचही चेंडू मध्यमगतीचे टाकले होते.
शेवटचा चेंडू बाउंसर टाकताच पांड्यानं त्यावर जोरदार प्रहार केला आणि चेंडू थेट सीमापार धाडला. इथंच बंगळुरुचा हातून सामना निसटला.