तिरंदाज दीपिका कुमारीकडून जागतिक विक्रमाचा लक्ष्यवेध
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2016 11:46 AM (IST)
मुंबई : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेध करत जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आहे. शांघाईतील तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये दीपिकाकुमारीने दक्षिण कोरियाच्या तिरंदाजाची बरोबरी केली. 21 वर्षांच्या दीपिकाकुमारीने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये 720 पैकी 686 गुण कमवले. या गुणांसह दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या 2015 मधील गुणांची दीपिकाकुमारीने बरोबरी केली आहे. 2011, 2012 आणि 2013 मधील विश्वचषकांमध्ये दीपिकाने रौप्यपदकांची कमाई केली होती. तिला नुकतंच पद्मश्रीनेही गौरवण्यात आलं आहे. 2010 राष्ट्रकूल स्पर्धेतही तिने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली, तर 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला रजत पदक मिळालं होतं. गेल्या वर्षी कोपनहेगनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतील कामगिरीमुळे तिला रिओ ऑलिम्पिकचंही तिकीट मिळालं आहे.