CWG 2026: कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2026) सुरू असताना ग्लासगो (Glasgow) येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) भारताच्या (India) अपूर्ण नकाशामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) यांनी रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात आलेल्या नॅपकिनवर (Napkin) छापलेल्या भारताच्या नकाशात ईशान्य भारत (Northeast India) आणि काश्मीर (Kashmir) दाखवले नसल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्लासगोतील 'मिस्टर सिंग्स इंडिया – द होम ऑफ करी' या रेस्टॉरंटमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत यश मिळवलेल्या भारतीय खेळाडूंसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वापरण्यात आलेल्या नॅपकिनवरील भारताच्या नकाशामुळे हा वाद उफाळून आला.
CWG 2026: 'ईशान्य भारत नकाशातून गायब'
लव्हलिना बोर्गोहेन यांनी नॅपकिनवरील नकाशाकडे लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "या नॅपकिनवरील भारताच्या नकाशात आमचा ईशान्य भारतच नाही. भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि त्याचे योग्य प्रतिनिधित्व झाले पाहिजे." लव्हलिनाच्या या वक्तव्यानंतर हा मुद्दा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे.
CWG 2026: बॉक्सिंग महासंघाचाही तीव्र आक्षेप
लव्हलिनाच्या भूमिकेला भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह (Ajay Singh) यांनीही पाठिंबा दिला. अजय सिंह यांनी सांगितले की, नॅपकिनवर छापलेला नकाशा भारताच्या अधिकृत सीमांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाही. विशेषतः काश्मीर आणि ईशान्य भारत नकाशातून गायब असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी संबंधित रेस्टॉरंटला हा नकाशा तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे.
CWG 2026: रेस्टॉरंटची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही
या संपूर्ण वादावर संबंधित रेस्टॉरंटकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र भारतीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपामुळे हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे.
CWG 2026: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी
दरम्यान, कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. भारतीय बॉक्सर्सनी विक्रमी सात सुवर्णपदके (Gold Medals) जिंकत इतिहास रचला. भारताने बॉक्सिंगमध्ये सात सुवर्ण आणि तीन रौप्यपदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले. याशिवाय सोमन राणा यांनी पुरुषांच्या एफ-57 पॅरा गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. शनिवारी झालेल्या स्पर्धेनंतर भारताने एकूण 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी 39 पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली.
आणखी वाचा
