Riyadh All-Star vs PSG Match : फुटबॉल जगतात सध्याच्या घडीचे दोन दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी. या दोघांचा सामना म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते पण आता दोघेही एका लीगमध्ये नसल्याने एकामेंकासमोर येण्याची शक्यता फारच कमी. पण आता पॅरिस सेंट जर्मन (PSG) आणि रियाध ऑल स्टार इलेव्हन (Riyadh 11) यांच्यात गुरुवारी सौदी अरेबियातील रियाध शहरात खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघेही आमने-सामने आले होते. अगदी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मेस्सी, रोनाल्डो आणि एमबाप्पे यांनी गोल केले. रोनाल्डोने दोन गोल केले मात्र त्याचा संघ जिंकू शकला नाही. हा सामना लिओनेल मेस्सीचा संघ पीएसजीच्या बाजूने झुकला. पीएसजीने हा सामना 5-4 च्या फरकाने जिंकला. 


अखेरपर्यंत सामना रंगतदार स्थितीत


हा सामना पाहण्यासाठी रियाधचे स्टेडियम पूर्णपणे हाऊसफुल्ल झाले होते. मेस्सी आणि रोनाल्डोला समोरासमोर पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. हे दोन्ही दिग्गज स्टेडियममध्ये दाखल झाले तेव्हा तेथील वातावरण पाहण्यासारखे होते. या मोठ्या खेळाडूंनी बॅक टू बॅक गोल केल्याने चाहत्यांची मजा आणखीच वाढली होती. सामन्यात मेस्सीने सुरुवातीचा गोल केला तर रोनाल्डोने दोन गोल केले. सामन्याच्या पहिल्या तीन मिनिटांत लिओनेल मेस्सीने पीएसजीला आघाडी मिळवून दिली. यानंतर 34व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल करत आपल्या संघाला बरोबरीत आणले. 43व्या मिनिटाला मार्क्विनहोसने गोल करून पीएसजीला पुन्हा आघाडी मिळवून दिली, परंतु हाफ टाईमपूर्वी रोनाल्डोने (45+6) गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. पूर्वार्धातच पीएसजीच्या खेळाडूला रेड कार्ड मिळाले. अशा स्थितीत पीएसजी संघ संपूर्ण वेळ 10 खेळाडूंसह खेळत राहिला. मात्र, असे असतानाही त्यांनी उत्तम खेळी केली. 53व्या मिनिटाला सर्जिओ रेमोसने गोल करत पीएसजीला आघाडी मिळवून दिली, मात्र तीन मिनिटांनंतर जेंगने पुन्हा गोल करून सामना बरोबरीत आणला. 60 व्या मिनिटाला किलियन एमबाप्पे आणि 78 व्या मिनिटाला एकेटीकेने गोल करून पीएसजीला 5-3 अशी दमदार आघाडी मिळवून दिली. दुखापतीच्या वेळेत तालिस्काने रियाधसाठी गोल केला पण त्याने निकाल बदलला नाही. ज्यामुळे रियाध ऑल स्टारला हा सामना 4-5 ने गमवावा लागला. दरम्यान सामना फ्रेंडली असल्याने सर्वच खेळाडू अगदी खेळीमेळीच्या वातावरणात खेळत होते. रोनाल्डोनेही सर्व खेळाडूंची आवर्जून भेट घेतली.



हे देखील वाचा-