मुंबई : टीम इंडियाची बेबी म्हणून 21 वर्षांच्या रिषभ पंतची ओळख करुन देण्यात येत असली, तरी याच वयात तो लहान मुलांना सांभाळण्याइतपत समंजस झाला आहे. 'बेबीसीटर' रिषभ पंतचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मेलबर्न कसोटीत यष्टिरक्षक रिषभ पंत आणि कर्णधार टिम पेन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी पेनने पंतला आपल्या मुलांचा बेबीसीटर म्हणून सांभाळ करण्याचा सल्ला दिला होता. तर पंतने पेनला 'तात्पुरता कर्णधार' म्हणून हिणवलं होतं. 'तू बेबीसिटींग करतोस का? मी माझ्या बायकोला एखाद्या रात्री घेऊन सिनेमाला जाईन. तेव्हा तू माझ्या मुलांचा सांभाळ कर' असं म्हणत फलंदाजी करणाऱ्या रिषभला पेनने डिवचलं होतं. पंतने पेनचा सल्ला किंबहुना 'स्लेजिंग' फारच मनावर घेतल्याचं दिसतं. कारण लहान मुलांना सांभाळण्याच्या रिषभ पंतच्या कौशल्याचं चक्क पेनची पत्नी बोनीनेही कौतुक केलं. बोनीने आपल्या लेकाला रिषभ पंतने उचलून घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या छायाचित्राखाली बोनीने सर्वोत्तम बेबीसिटर म्हणून रिषभ पंतचा उल्लेख केला आहे. हे छायाचित्र ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या निवासस्थानातलं आहे.