India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिल्यानंतर आता भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या सामन्यानंतर लगेचच भारतीय संघ ऑगस्टमध्ये झिम्बॉब्वेचा ( Zimbabwe Vs India) दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला आहे, यावेळी शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं असून दुखापतीमुळे संघाबाहेर असणारे वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चाहर संघात परतले आहेत.

या वेळी संघातील दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, रवींद्र जाडेजा, बुमराह हे संघात नसून नेमका संघ कसा आहे पाहूया...

झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

महत्वाचं म्हणजे, भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात खेळली जाणारी तीन सामन्यांची मालिका आयसीसी एकदिवसीय सुपर लीगचा भाग असेल. भारताविरुद्ध मायभूमीवर खेळली जाणारी एकदिवसीय मालिका झिम्बॉब्वेसाठी अतिशय महत्वाची असेल. कारण, या मालिकेतील गुण पुढच्या होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रतेसाठी मोजले जातील. भारतासाठी ही मालिका इतकी महत्वाची नाही. भारत अगोदरचं आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरलाय. 

भारतीय संघ 15 ऑगस्टला झिम्बॉब्वे दौरा करण्याची शक्यता

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यातील अखेरचा सामना 7 ऑगस्ट 2022 खेळणार आहे. त्यानंतर एक आठवड्यानंतर भारत झिम्बॉब्वेचा दौरा करण्याची शक्यता आहे. भारत 15 ऑगस्टला झिम्बॉब्वेला दाखल होऊ शकतो. क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि झिम्बॉवे यांच्यातील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळले जातील. “भारताचं यजमानपद मिळवून आम्हाला खूप आनंद झालाय. आम्ही स्पर्धात्मक आणि अविस्मरणीय मालिकेची वाट पाहत आहोत”, असं झिम्बाब्वे क्रिकेटच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलंय. 

 झिम्बॉब्वे- भारत एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉब्वे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती.