ZIM Beat AUS T20 World Cup 2026 Points Table 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये शुक्रवारी एक असा चमत्कार घडला, ज्याची कल्पना कदाचित कट्टर क्रिकेट चाहत्यांनीही केली नसेल. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या 'ग्रुप बी' मधील सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव करत विश्वचषकातील सर्वात मोठा अपसेट नोंदवला आहे. या विजयामुळे झिम्बाब्वेने इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले असून ऑस्ट्रेलियन संघाचे स्पर्धेतील आव्हान आता धोक्यात आले आहे.

Continues below advertisement

Continues below advertisement

झिम्बाब्वेची दमदार फलंदाजी 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा झिम्बाब्वेचा निर्णय सार्थ ठरला. सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव टाकला. निर्धारित 20 षटकांत झिम्बाब्वेने केवळ 2 गडी गमावून 169 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर ब्रायन बेनेटने 7 चौकारांसह 64 धावांची शानदार नाबाद खेळी केली. तदिवानाशे मारुमानी यांनीही 11 चेंडूत 35 धावा केल्या. रायन बर्लने 30 चेंडूत 35 धावा केल्या आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी 13 चेंडूत नाबाद 25 धावा करून संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

कांगारूंचा डाव कोसळला

170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. झिम्बाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 146 धावांत गारद झाला. झिम्बाब्वेच्या चपळ क्षेत्ररक्षणाने आणि अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीने कांगारूंना 23 धावांनी पराभवाची धूळ चारली.

गुणतालिकेतील समीकरण बदलले

या ऐतिहासिक विजयानंतर 'ग्रुप बी' मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. झिम्बाब्वेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा आहे, कारण या पराभवासह ते आता स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. झिम्बाब्वेसाठी हा केवळ विजय नसून जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याची मोठी संधी ठरली आहे.

ग्रुप B - गुणतालिका

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
श्रीलंका 2 2 0 0 4 3.125
झिम्बाब्वे 2 2 0 0 4 1.98
ऑस्ट्रेलिया 2 1 1 0 2 1.1
आयरलँड 2 0 2 0 0 -2.175
ओमान 2 0 2 0 0 -4.306

हे ही वाचा -

IND vs PAK Colombo Weather Forecast : भारत-पाकिस्तान भिडणार, पण पाऊस डाव मोडणार, कोलंबोची हवा बदलली, 15 फेब्रुवारीला सामना रद्द? धाकधूक वाढवणारा Weather Report