Yuzvendra Chahal Preity Zinta : आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स सध्या अक्षरशः सातव्या आसमानावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघ या हंगामातील एकमेव असा संघ ठरला आहे, ज्याला अजूनपर्यंत कोणीही पराभूत करू शकलेले नाही. 7 पैकी 6 सामने जिंकत पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. संघाच्या या दमदार कामगिरीमुळे सह-मालकीण प्रीती झिंटा (Preity Zinta) अत्यंत आनंदी असून जवळपास प्रत्येक सामन्यात ती खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसते.

चहलची मस्ती, प्रीतीचा भन्नाट प्रतिसाद!

सोमवार, 27 एप्रिल रोजी प्रीती झिंटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चाहत्यांसोबत प्रश्न-उत्तरे सत्र सुरू केले. त्यावेळी संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने एंट्री घेत एक भन्नाट मागणी केली की, “मॅम, एका सामन्यात मला ओपनिंगला फलंदाजी करण्याची संधी मिळेल का?” चहलची ही मिश्किल मागणी पाहून चाहत्यांना हसू आवरले नाही. सोशल मीडियावर लगेचच चर्चा रंगली. “आता चहल गोलंदाजीनंतर फलंदाजीतही कमाल दाखवणार का?” 

प्रीतीनेही हा खेळकर क्षण तितक्याच मजेदार शैलीत हाताळला. तिने उत्तर दिले की, “नक्कीच यूजी, तुझ्यासाठी काहीही... फक्त एकदा आयपीएल संपवू दे, त्यानंतर तुला हवे त्या सामन्यात ओपनिंग करता येईल. प्रभसिमरन आणि प्रियांश यांनाही त्यात काही हरकत नसेल, याची मला खात्री आहे.” 

चहलची या हंगामातील कामगिरी

या हंगामात चहलने 7 सामन्यांत 4 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या या अनुभवी गोलंदाजासाठी हा सीझन थोडा चढ-उताराचा ठरला आहे. त्याचा इकॉनॉमी रेट (9.76) थोडा महाग वाटत असला, तरी स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये त्याचा अनुभव पंजाबसाठी खूप मोलाचा ठरू शकतो.

पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विक्रम

पंजाब किंग्स सध्या पूर्ण आत्मविश्वासात आहे. मागील सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रन चेस (265 धावा) पूर्ण करत इतिहास रचला. अरुण जेटली स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने 265 धावांचे लक्ष्य 5 विकेट्स गमावून, अजून 7 चेंडू बाकी असतानाच गाठले. आता पंजाब किंग्सचा पुढील सामना 28 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध न्यू चंदीगड येथे होणार आहे. चाहत्यांना अपेक्षा आहे की, पंजाबची ही विजयी घोडदौड अशीच कायम राहील.

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप...; पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञाचा दावा, क्रिकेट विश्वात खळबळ