Yuvraj Singh comeback News : अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यानं मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. युवराज सिंह यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फेब्रुवारी 2022 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं जाहीर केलं आहे. जून 2019 मध्ये युवराज सिंह यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 2007 मधील टी-20 आणि 2011 च्या वन-डे विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजनं सिंहाचा वाटा उचलला होता.


अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यानं इन्स्टाग्राम पोस्ट करत आपल्या परतीची घोषणा केली आहे. खेळाडू म्हणून परतणार की नव्या भूमिकेत दिसणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. युवराजनं आपल्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये 2007 मध्ये एकाच षटकात लगावलेले सहा षटकार आणि कटक येथे 150 धावांची केलेल्या धुवांधार खेळी दिसत आहेत. आपल्या पोस्टमध्ये युवराज म्हणतोय की, ‘भगवान आपलं भविष्य लिहित असतो. लोकांच्या डिमांडनंतर फेब्रुवारीमध्ये क्रिकेटच्या मैदानावर परत येत आहे. यापेक्षा चांगली फिलींग काहीच होऊ शकत नाही. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छासाठी धन्यवाद. आपल्या संघाला सपोर्ट देत राहा. जय हिंद!





एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8701 धावा
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. युवराजने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे.  
कसोटीमध्ये 40 सामने
युवीने 40 कसोटी सामन्यात 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहे. यात तीन शतकं आणि 11 अर्धशतकं करण्याचा पराक्रम केला आहे.
टी-20 स्पेशालिस्ट
 टी-20 क्रिकेटचा स्पेशालिस्ट समजला जाणारा युवराज भारतीय संघासाठी 58 वेळा मैदानात उतरला आहे. टी-20 मध्ये युवराज सिंहने 1177 धावा बनवल्या आहेत, ज्यात आठ वेळा 50 किंवा यापेक्षा जास्त धावांची खेळी रचली आहे.
सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंह हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. युवराज सिंहने साल 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केवळ 12 चेंडूंमध्ये 50 धावा करण्याचा कारनामा केला होता.
'सिक्सर किंग' युवराज
युवराजने याच सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 चेंडूंवर सलग सहा षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यामुळे युवराजला 'सिक्सर किंग' ही नवी ओळख मिळाली.
गोलंदाजीतही कमाल
युवराज सिंहने भारतीय संघासाठी केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीत कमाल केली आहे. युवराजने भारतासाठी वनडेमध्ये 111 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये युवराजची सर्वोत्तम कामगिरी होती 31 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स. वनडेशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये युवराजने 9 आणि टी-20 मध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.
प्रथम श्रेणीतही दमदार कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही युवराजची कामगिरी दमदार होती. पंजाबसाठी युवराजने 139 प्रथम श्रेणी, 423 लिस्ट ए आणि 231 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्त्व केलं आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये युवराज सिंहने 8965 धावा केल्या आहे, ज्यात 36 अर्धशतकं आणि 26 शतकांचा समावेश आहे.
तर लिस्ट ए मध्ये युवराज सिंहने 37.91 च्या सरासरीने 12663 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये युवराज सिंहच्या नावावर 78 अर्धशतकं आणि 19 शतकांची नोंद आहे.
याशिवाय टी-20 मध्ये युवराजने 4857 धावा केल्या आहेत.