Yashasvi Jaiswal Injury : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी स्टार सलामीवीर जखमी! कॅप्टनने घेतला मोठा निर्णय; संघातून वगळले, कोणाला दिली संधी?
चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळल्यानंतर यशस्वी जैस्वाल रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार होता.

Yashasvi Jaiswal Ruled Out Of Ranji Semi-final : टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तो जखमी झाला आणि संघाबाहेर आहे. जैस्वालच्या घोट्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
यशस्वी जैस्वालची यापूर्वी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात निवड झाली होती. तो 15 सदस्यीय संघातील तिसरा सलामीवीर होता. पण, जेव्हा जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आणि संघाची पुन्हा घोषणा करण्यात आली, तेव्हा जैस्वालचे नाव 15 जणांच्या यादीत नसल्याचे उघड झाले. जैस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आली.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळल्यानंतर यशस्वी जैस्वाल रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार होता, परंतु आता तो दुखापतग्रस्त आहे आणि मुंबईच्या रणजी संघातून ही बाहेर गेला आहे. सोमवारपासून मुंबईला विदर्भाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशस्वी जैस्वाल लवकरच त्याच्या दुखापतीचे अधिक मूल्यांकन करण्यासाठी बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये जाऊ शकतो, कारण त्याला भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात 'संघासोबत प्रवास न करणारा राखीव खेळाडू' म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे कधीही जाऊ शकतात दुबईला...
2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य संघातून मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांना वगळण्यात आले आहे, परंतु तरीही ते स्पर्धेत खेळतील अशी अपेक्षा आहे. हे दोन्ही प्रवास न करणारे पर्याय आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा खेळाडू जखमी होतो, तेव्हा त्याला बदली खेळाडू म्हणून दुबईला पाठवता येते.
जैस्वालने या हंगामात खेळला फक्त एक सामना!
भारतीय कसोटी संघाचा नियमित भाग बनलेला यशस्वी जैस्वाल या हंगामात फक्त एकच रणजी ट्रॉफी सामना खेळला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मुंबई यशस्वीने जम्मू आणि काश्मीर विरुद्ध सामना खेळला. पण मुंबई संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. यशस्वीने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 26 धावा केल्या.
मुंबईची ताकद होणार कमी?
जैस्वालच्या अनुपस्थितीमुळे मुंबईची ताकद कोणत्याही प्रकारे कमी होत नाही. मुंबई संघात आधीच अनेक स्टार आणि बलाढ्य खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत जैस्वाल बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसणार नाही. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणे कोणाला संधी देतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. हा सामना गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती आहे, ज्यामध्ये मुंबईने विदर्भाला हरवून जेतेपद पटकावले होते.





















