Yashasvi Jaiswal vs Asitha Fernando Ind vs SL 2nd Test :कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर चांगलाच वाद रंगला. भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती इतकी तापली की दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्नही झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळे केले.

Continues below advertisement

यशस्वीला आऊट करताच असिथाचं सेलिब्रेशन (Yashasvi Jaiswal vs Asitha Fernando 2nd Test)

भारताच्या डावात यशस्वी जैस्वाल शानदार फलंदाजी करत होता. तो अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच असिथा फर्नांडोने त्याला आऊट केले. राउंड द विकेटवरून आलेला चेंडू यशस्वीच्या बॅटला लागला आणि त्यानंतर थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे यशस्वी 45 धावांवर बाद झाला. यशस्वीची विकेट मिळाल्यानंतर असिथा फर्नांडोचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो जोरदार सेलिब्रेशन करत होता. यशस्वी पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना असिथाने त्याला काहीतरी म्हटल्याचे दिसून आले. हे ऐकल्यानंतर यशस्वी अचानक मागे फिरला आणि थेट असिथाच्या दिशेने गेला.

Continues below advertisement

दोघेही आमनेसामने, धक्काबुक्कीचीही वेळ

यानंतर यशस्वी आणि असिथा एकमेकांसमोर उभे राहिले. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. प्रकरण इतके तापले की दोघांनी एकमेकांना धक्का देण्याचाही प्रयत्न केला. मैदानावरील वातावरण काही क्षणांसाठी तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसताच श्रीलंकेचे इतर खेळाडू तातडीने मध्ये आले. त्यांनी यशस्वी आणि असिथाला एकमेकांपासून दूर केले. त्यानंतर यशस्वी पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना झाला.

लंचपर्यंत टीम इंडिया 88 धावांवर 2 विकेट (Ind vs SL 2nd Test Day 1 Lunch Break)

भारताला पहिला धक्का केएल राहुलच्या रूपाने बसला. राहुलला 18 धावांवर लाहिरू कुमारा याने बाद केले. त्यानंतर यशस्वी जैस्वालने बाद होण्यापूर्वी आक्रमक फलंदाजी केली. 17व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याचा डाव संपला. विशेष म्हणजे त्याआधीच्या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर यशस्वीने तब्बल तीन चौकार ठोकले होते.  यशस्वीने 53 चेंडूंचा सामना करत 45 धावा केल्या. त्याच्या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताने 2 विकेट गमावत 88 धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार शुभमन गिल 11, तर देवदत्त पडिक्कल 13 धावांवर नाबाद आहे. 

हे ही वाचा - 

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : आऊट देताच जैस्वालने बाहेरचा रस्ता धरला, श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचताच पुन्हा माघारी आला, हेल्मेटने टक्कर दिली, भारत-श्रीलंकेच्या सामन्यात राडा, VIDEO