WTC Final Scenario : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला WTC क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. पर्थ कसोटी जिंकून भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता, पण ॲडलेडमध्ये झालेल्या पराभवानंतर दोन स्थानांनी घसरण झाला, आता टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा पराभव करून WTC फायनलमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. पुढील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. टीम इंडिया आतापर्यंत झालेल्या दोन्ही फायनलमध्ये पोहोचली होती.
दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ डब्ल्यूटीसीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने मेगा इव्हेंटकडे एक पाऊल टाकले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दक्षिण आफ्रिकेला आता पाकिस्तानविरुद्ध मायदेशात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी एकही सामना जिंकला तर त्यांचे WTC फायनलमधील स्थान निश्चित होईल. दक्षिण आफ्रिकेने 10 पैकी 6 सामने जिंकून WTC पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. ॲडलेड कसोटीत भारताला पराभूत करण्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला असून 14 सामन्यांत 9 विजयांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
भारताचे समीकरण काय?
ॲडलेडमधील पराभवानंतर टीम इंडियासाठी WTC फायनलमध्ये प्रवेश करणे जरा अवघड झाले आहे. रोहित शर्मा अँड कंपनीला उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकावे लागतील. आता या मालिकेत भारतीय संघ एकतरी कसोटी सामना हारला तर त्यांचे नशीब त्यांच्या हातात नसेल. यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
ऑस्ट्रेलियाचे समीकरण काय?
दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ WTC गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने त्यांचे काम बिघडले आहे आणि पॅट कमिन्सचा संघ नंबर-2 वर गेला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धची मालिका किमान 2-2 अशी राखावी लागेल. याशिवाय श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत त्यांना विजयाची गरज आहे.
श्रीलंका या स्पर्धेतून गेला नाही बाहेर
श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी ते अजूनही डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले नाहीत. मात्र, आता त्यांच्या भवितव्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या हातात आहे. श्रीलंकेला पुढे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायची असून त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील.
हे ही वाचा -