ICC WTC Final 2025 prize Money : दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिका हा WTC फायनल जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली. दक्षिण आफ्रिकेने रोमांचक अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने 83.4 षटकांत 282 धावांचे लक्ष्य गाठले. एडेन मार्करामने शतक झळकावले तर कर्णधार टेम्बा बावुमाने अर्धशतक झळकावून विजयाचा पाया रचला. पहिल्यांदाच WTC फायनल जिंकल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. पराभूत ऑस्ट्रेलियन संघही करोडपती झाला आहे.

WTC फायनल जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सुमारे 30.7 कोटी रुपये (3.6 दशलक्ष डॉलर्स) बक्षीस मिळाले. WTC फायनल हरणाऱ्या संघाला सुमारे 18.53 कोटी रुपये (2.16 दशलक्ष डॉलर्स) मिळाले. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. टीम इंडियाला 1.44 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 12.30 कोटी रुपये मिळाले. 

चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघाला 1.44 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळाले. गेल्या वेळी त्यांना 350,000 अमेरिकन डॉलर्स मिळाले. दुसरीकडे, पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला 960,000 डॉलर्स मिळाले. गेल्या वेळी त्यांना 200,000 डॉलर्स मिळाले.

पाकिस्तानला मिळाली सर्वात कमी बक्षीस रक्कम...

श्रीलंकेला सायकलमध्ये सहाव्या क्रमांकावर राहून 840,000 डॉलर्स मिळाले, तर सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेश संघाला 720,000 डॉलर्स आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजला 600,000 डॉलर्स मिळाले. पाकिस्तान या यादीत सर्वात खाली होता. नवव्या क्रमांकावर राहिल्याने पाकिस्तानला 480,000 डॉलर्स मिळाले.

 टी-20 वर्ल्ड कप पेक्षा WTC जिंकण्याऱ्या संघाला मिळाली जास्त रक्कम 

गेल्या वेळी टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा विजेता बनल्याबद्दल सुमारे 20.4 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली. याचा अर्थ असा की, WTC चॅम्पियनला टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघापेक्षा जास्त बक्षीस रक्कम मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 जून रोजी आयपीएलचे विजेतेपद जिंकले तेव्हा त्यांना 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली होती.