WTC Points Table : एक पराभव अन् न्यूझीलंडचा झाला गेम, WTCरेसमध्ये नवा ट्विस्ट; दक्षिण आफ्रिकेची झेप, Points Tableमध्ये भारत कुठे अन् टॉपवर कोण?
WTC Points Table After ENG vs NZ Test : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 115 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला.

WTC Points Table After ENG vs NZ Test : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 115 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही, मात्र इंग्लंडने सर्व विभागांत सरस कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे इंग्लंडच्या खात्यात महत्त्वाचे गुण जमा झाले असले, तरी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) गुणतालिकेत त्यांची स्थिती फारशी सुधारलेली नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडला या पराभवाचा मोठा फटका बसला असून त्यांना दोन स्थानांची घसरण सहन करावी लागली आहे.
इंग्लंडची स्थिती अजूनही बिकट
इंग्लंडने WTC 2025-27 चक्रात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ 4 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. एक सामना अनिर्णित राहिला असून 6 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 37.8 टक्के गुणांसह इंग्लंड सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. लॉर्ड्समधील विजयामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे समीकरण अजूनही कठीण दिसत आहे.
न्यूझीलंडला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेला फायदा
या पराभवापूर्वी न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर होता. मात्र इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर किवी संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत 4 सामने खेळले असून 2 विजय, 1 अनिर्णित आणि 1 पराभव झाला आहे. गुणतालिकेतील या घसरणीमुळे त्यांच्या अंतिम फेरीच्या शर्यतीला धक्का बसला आहे. न्यूझीलंडच्या पराभवाचा सर्वाधिक फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. आफ्रिकन संघाने तिसऱ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे WTC अंतिम फेरीच्या शर्यतीत त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
भारताचीही अवस्था फारशी चांगली नाही
टीम इंडियाची स्थितीदेखील सध्या समाधानकारक नाही. भारताने या WTC चक्रात 9 सामने खेळले असून त्यापैकी 4 विजय, 4 पराभव आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे. 48.15 टक्के गुणांसह भारत सध्या सहाव्या स्थानावर आहे. आगामी सामन्यांत सातत्यपूर्ण विजय मिळवले नाहीत, तर अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते. त्यामुळे भारतासाठी पुढील प्रत्येक कसोटी सामना ‘करो या मरो’सारखा महत्त्वाचा ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम
WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम आहे. कांगारू संघाने 8 पैकी तब्बल 7 सामने जिंकले असून फक्त एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. 87.5 टक्के गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर भक्कमपणे विराजमान आहे. त्यांच्या सध्याच्या कामगिरीकडे पाहता, WTC अंतिम फेरीसाठी ते सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहेत. लॉर्ड्समधील या निकालामुळे WTC ची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे. न्यूझीलंडची घसरण, दक्षिण आफ्रिकेची झेप आणि भारत-इंग्लंडची संघर्षमय स्थिती यामुळे आगामी कसोटी सामने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
हे ही वाचा -
FIFA विश्वचषक 2026 आधी अमेरिकेत धक्कादायक घटना! इंग्लंडच्या बेस कॅम्पजवळ अंदाधुंद फायरिंग, 9 जण जखमी




















