WPL 2023 Live : महिला प्रीमियर लीग (WPL) अर्थात महिलांची आयपीएल यंदा पहिल्यांदाच पार पडणार आहे. यासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया म्हणजे WPL Auction आज (13 फेब्रुवारी) पार पडणार आहे. अनेक दिवसांपासून महिला आयपीएलची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना बीसीसीआयने यंदा महिला आयपीएलची पर्वणी देण्याचं ठरवलं आहे. त्यात आज महिला प्रीमियर लीगचा लिलाव होणार असून ही लीग 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान खेळवली जाईल. महिलांच्या आयपीएल लिलावाचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम 18 नेटवर्कवर केले जाईल, ज्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात म्हणजेच यंदा एकूण 5 फ्रँचायझी सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या हंगामात दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद आणि लखनौचे संघ खेळताना दिसतील. महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज दुपारी 2:30 वाजता होणार आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एकूण 1525 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली होती, त्यातील 409 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यातील 202 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे, तर 199 खेळाडू असे आहेत ज्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. सर्व फ्रँचायझींना 12 कोटी रुपयांची पर्स व्हॅल्यू देण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या संघात जास्तीत जास्त 18 खेळाडूंचा समावेश करावा लागेल.
महिला प्रीमियर लीगचा लिलाव कुठे होत आहे?
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आज (13 फेब्रुवारी) मुंबईत होणार आहे.
खेळाडूंची लिलाव प्रक्रिया किती वाजता सुरु होईल?
महिला प्रीमियर लीगचा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
महिला प्रीमियर लीगसाठीचा लिलाव कुठे पाहू शकता?
महिला प्रीमियर लीग खेळाडूंचा लिलाव स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. त्याच वेळी, या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर देखील केले जाईल.
कुणी किती रुपयाला खरेदी केला संघ ?
महिला प्रीमियर लीगमधील पाच संघासाठी लिलाव काही दिवसांपूर्वी पार पडला. अहमदाबाद संघाला सर्वाधिक बोली लागली होती. अदानी स्पोर्ट्स लाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला 1289 कोटी रुपयांत खरेदी केलं. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला 912.99 कोटी रुपयांत खरेदी केलं. महिला आयपीएलमधील तिसऱ्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने खरेदी केलं. आरसीबीने बंगलोरसाठी 901 कोटी रुपये मोजलेत. तर दिल्लीच्या संघाला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 810 कोटी रुपयांत खरेदी केलं. कापरी ग्लोबल होल्डिंग्स यांनी लखनौच्या महिला संघासाठी 757 कोटी रुपये मोजले आहेत. वुमन्स प्रीमियर लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत 4669.99 कोटी रुपये इतकी झाली आहे.
हे देखील वाचा-