World cup points table : भारतानं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला. भारताचा हा नऊ सामन्यांमधला नववा विजय ठरला. या विजयासह रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांना देशवासीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. या सामन्यात भारतानं दिलेल्या 411 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सनं 47 षटकं आणि पाच चेंडूंत सर्व बाद 150 धावांची मजल मारली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. विराट कोहली आणि रोहित शर्मानंही प्रत्येकी एकेक विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया अजेय राहिली आहे. भारताने सलग नवव्या विजयाची नोंद केली. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.  


उपांत्या फेरीचे संघ निश्चित - 


भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. भारताने नऊ सामन्यात 18 गुणांची कमाई केली. इतर संघ भारताच्या आसपासही नाहीत. दुसऱ्या क्रमांकावर असणारा आफ्रिकेचा संघ 14 गुणांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघही 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मुंबईत उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यामध्ये कोलकात्यात सामना होणार आहे. 


अफगाणिस्तानची चांगली कामगिरी, पाकिस्तानचे स्वप्न भंगले - 


यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तान गोलंदाजी आणि फलंदाजीत मागे राहिला. पाकिस्तानला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागलेय. पाकिस्तान संघाला नऊ सामन्यात फक्त चार विजय मिळवता आले. अफगाणिस्तान संघाने चार विजय मिळवले. अफगाणिस्तान संघाने अपेक्षापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. इंग्लंडसारख्या संघाला मागे टाकत सहावे स्थान पटकावले. 


तळाच्या संघाची काय स्थिती - 
नेदरलँड्सचा संघ तळाशी आहे. नेदरलँड्सच्या संघाला फक्त दोन विजय मिळवता आले. श्रीलंका संघ नवव्या स्थानावर आहे. त्यांनाही फक्त दोन विजय मिळवता आले. बांगलादेशचा संघालाही दोन विजय मिळवता आले. ते आठव्या स्थानावर  राहिलेत. गतवेळच्या विजेत्या इंग्लंडला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागेल.  इंग्लंडला नऊ सामन्यात तीन विजय मिळवता आले. अखेरच्या दोन्ही साखळी सामन्यात विजय मिळवता आल्यामुळे इंग्लंड संघ 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र ठरलाय.