World Cup 2023 Records : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. यंदाची ही 13 वी विश्वचषक स्पर्धा आहे. आतापर्यंत झालेल्या महाकुंभामध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाच गोलंदाजाविषयी जाणून घेऊयात... विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. भारताकडून  विश्वचषकात सर्वाधिक विकेट झहीर खान याने घेतल्या आहेत. 


वनडे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राथच्या नावावर आहे. त्याने 71 विकेट घेतल्या आहेत. जगातील घातक गोलंदाजामध्ये ग्लेन मॅक्ग्राथ याचे नाव आघाडीवर आहे. ग्लेन मॅक्ग्राथ याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथया मुरलीधऱन याचा क्रमांक लागतो. मुरलीधरन याने 40 सामन्यात 68 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचाही या यादीत समावेश आहे. मलिंगाच्या यॉर्करपुढे अनेकजणांनी गुडघे टेकले. मलिंगाने 29 सामन्यात 56 विकेट घेतल्या. 38 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट ही मलिंगाची सर्वोत्तम कामगिरी होय. पाकिस्तानच्या वसीम आक्रमचा चौथा क्रमांक लागतो. वसीम अक्रमने 38 सामन्यात 55 विकेट घेतल्यात. तर स्टार्कने 49 विकेट घेत पाचवे स्थान काबिज केलेय. यंदाच्या विश्वचषकात स्टार्क लसिथ मलिंगा आणि वसीम आक्रम यांचा विक्रम मोडू शकतो. स्टार्कने पहिल्याच सराव सामन्यात भेदक मारा करत हॅट्ट्रीक घेण्याचा करिष्मा केलाय. 




दरम्यान, विश्वचषकात विकेट घेणाऱ्या आघाडीच्या पाच गोलंदाजामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. भारतासाठी सर्वाधिक विकेट झहीर खान याने घेतल्या आहेत. झहीर खानच्या नावावर 44 विकेट आहेत. 


भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे पाच गोलंदाज-


1. झहीर खान (Zaheer khan) :


विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये झहीर खान पहिल्या स्थानावर आहे. 2011 च्या विश्वचषक विजयात झहीर खान याचा सिंहाचा वाटा होता. आयसीसीच्या महाकुंभामध्ये झहीर खान याने 23 सामन्यात 4.47 इकॉनॉमिनीने 44 विकेट घेतल्यात. झहीर खान याने विश्वचषकात 12 षटके निर्धाव फेकली अन् एक वेळा चार विकेट घेतल्या. 


 2. जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) : 


भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथने विश्वचषकाच्या 34 सामन्यात प्रतिनिधित्व केलेय.  जवागल श्रीनाथने 34 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथने विश्वचषकात दोन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथने विश्वचषकात 21 षटके निर्धाव फेकली आहेत.


3. मोहम्मद शमी (Mohammed Shami) :


मोहम्मद शामीने विश्वचषकाच्या 11 सामन्यात  31 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. शामीने एक वेळा पाच आणि तीन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या विश्वचषकातही मोहम्मद शामीकडून दमदार कामगिरीची आपेक्षा असेल. अनुभवी मोहम्मद शामी भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. 


4. अनिल कुंबले (Anil Kumble) :


अनिल कुंबळे याने विश्वचषकात भारतासाठी 18 सामने खेळले आहेत. या 18 सामन्यात 4.08 च्या अकॉनॉमीने 31 विकेट घेतल्या आहेत. 


5. कपिल देव (Kapil Dev) : 


कपिल देव यांनी विश्वचषकाच्या 26 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. कपिल देव यांनी 26 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही कपिल देव यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहेत.