ODI World Cup 2023, India vs Pakistan Match : भारतामध्ये पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. वेळापत्रकानुसार, 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. पण सुरक्षेच्या कारणामुळे तारीख बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे सामन्याची तारीख बदलली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात आयसीसी आणि बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर आयोजित करण्यात आलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामुळे अहमदाबाद येथील हॉटेल्सच्या दरातही वाढ झाली. विमानाची तिकिटेही वाढली इतकच काय लोकांनी रुग्णालयात बेड बूक करण्यास सुरुवात केली होती. चाहत्यांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागला, आता आणखी एक मोठं आव्हान चाहत्यांसमोर उभं राहण्याची शक्यता आहे. सामन्याच्या तारखेत बदल झाला तर सर्व नियोजन पुन्हा एकदा करावे लागणार आहे. राहण्यापासून ये-जा करण्यापर्यंतची बुकिंग करावी लागणार आहे.
बीसीसीआयमधील एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे. अशा स्थितीत सुरक्षा यंत्रणांनी सामना रिशड्युल करण्याची विनिंती केली आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना घेण्यात यावा, अशी विनंती सुरक्षा यंत्रणांनी केली आहे. कारण, भारत आणि पाकिस्तान सामन्याला मोठी सुरक्षा लागणार आहे, त्यातच नवरात्र असल्यामुळे शहरातही ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे सामना 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑक्टोबर रोजी घेण्यात यावा.
आयसीसीच्या सुत्रांनी सांगितले की, यावर चर्चा करावी लागेल. जर सामन्यात बदल करायचा असेल तर त्यावरही चर्चा करावी लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे, पण चाहत्यांना राहणे आणि प्रवासात बदल करावा लागणार आहे. याबाबत चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. दरम्यान, भारतची विश्वचषकाची मोहिम 8 ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईमध्ये सामना होणार आहे. पाकिस्तानचे दोन सामने हैदराबादमध्ये होणार आहेत. 6 आणि 12 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान हैदराबादमध्ये दोन सामने खेळणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एक दिवस आधी झाला तर पाकिस्तानला सराव करण्यासाठी फक्त एक दिवसाचा अवधी मिळणार आहे.