World Cup 1983 History : वेस्ट इंडिजचे वर्चस्व संपवून भारतीय संघाने 1983 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. दोन वेळच्या जगज्जेत्याचा पराभव करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इतिहास रचला. विश्वचषक जिंकल्याचा भारतीय संघातील खेळाडूंनाही काही वेळ विश्वास बसला नव्हता. क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या विडिंजचा सुपडा साप करत तेव्हा भारताने चषक उंचावला होता. 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघाला अतिशय दुबळं आणि कमकुवत समजले जात होते. पण कपिल देव यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने सर्वांनाच धक्का दिला. क्रिकेट विश्वाच्या याच सोनेरी दिवसाबद्दल जाणून घेऊयात... 


पहिल्या दोन विश्वचषकाप्रमाणे 1983 चा विश्वचषकही 60 षटकांचाच होता. आठ संघांना दोन गुपमध्ये विभागण्यात आले होते.  इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ अ ग्रुपमध्ये होते. तर ग्रुप ब मध्ये भारत, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे या संघाचा समावेश होता. 9 ते 25 जून 1983 दरम्यान इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा रंगली होती. 


पाकिस्तान संघाने सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. ग्रुप अ मधून इंग्लंड आणि पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर ग्रुप ब मधून वेस्ट इंडिज आणि भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. साखळी सामन्यातील पहिल्याच सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत दिमाखात सुरुवात केली होती. दोन वेळच्या विजेत्याचा पराभव केल्यामुळे भारताच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर झिम्बॉवेचाही भारताने पाच विकेटने पराभव करत सेमीफायनलध्ये प्रवेश निश्चित केला. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव  केला होता. रनरेटच्या जोरावर भारताने सेमीफायनलध्ये प्रवेश मिळावला. 


कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी


1983 च्या विश्वचषकात भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात 18 जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारतानं 31 धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचं मोलाचं योगदान होतं. या सामन्यात त्यांनी नाबाद 175 धावांची खेळी करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.परंतु दुर्दैवानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही. कारण त्यावेळी देशातील एकमेव प्रसारक बीसीसीनं देशव्यापी संप पुकारला होता. ज्यामुळं कपिल देव यांची ही खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली नव्हती. 




सेमीफायनलमध्ये काय झाले ?


ग्रुप अ मधून इंग्लंड आणि पाकिस्तान तर ग्रुप ब मधून वेस्ट इंडिज आणि इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने यजमान इंग्लंडचा पराभव केला.भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली होती. इंग्लंडचा संपूर्ण संघ 213 धावांत आटोपला. कपिल देव यांनी 35 धावांत तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाने प्रत्युत्तरदाखल हे आव्हान सहा विकेट राखून सहज पार केले. यशपाल शर्मा यांनी 61 धावांची जिगरबाज खेळी केली. तर संदीप पाटील यांनी 51 धावांची विस्फोटक खेळी केली. पाकिस्तानचा  पराभव करत वेस्ट इंडिजने फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये फायनलचा थरार झाला. 




फायनलमध्ये काय झालं ? 


वर्ल्ड कप अंतिम सामन्यापर्यंत भारत पोहोचेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं हे करुन दाखवलं. पण अंतिम सामन्यात भारतापुढे दोन वेळच्या जगज्जेत्या वेस्ट इंडिज संघाचे आव्हान होते. वेस्ट इंडिज तोफगोळ्यासमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली. साखळी फेरीतील पराभवचा वचपा काढण्यासाठी विडिंजचा संघ ताकदीने उतरला होता. भारतीय संघ फक्त 183 धावांत ढेपाळला होता.  के श्रीकांतने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजला भारताने फक्त 140 धावांत रोखले. सर गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेंस हे लवकर तंबूत परतले होते. पण सर विवियन रिचर्ड्स (Sir vivian Richards) यांनी दुसऱ्या बाजूने तुफान फटकेबाजी सुरुच ठेवली होती.  कर्णधार कपिल देव यांनी रिचर्ड्स यांचा जबराट झेल घेतला, त्यानंतर चित्रच बदलले. रिचर्ड्स बाद झाल्यानंतर विंडिजच्या फलंदाजांनी नांगीच टाकली. संपूर्ण संघ 140 धावांत तंबूत परतला.  मदनलाल आणि अमनरनाथ यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.