West indies vs South Africa T20 Match : टी20 क्रिकेट (T20 Cricket) म्हणजे चौकार षटकारांचा पाऊसच आणि याचाच प्रत्यय आला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 सामन्यात. या अफलातून सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने तब्बल 258 धावा करत 259 धावांचे आव्हान दिले. जे दक्षिण आफ्रिकेने पूर्ण देखील केले या टी20 सामन्यात दोन शतकं पाहायला मिळाली. दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना अगदी दमदार पद्धतीनं जिंकत मालिकेतील आपलं आव्हानंही आफ्रिकेच्या संघानं जिवंत ठेवलं आहे. सामन्यात वेस्ट इंडिजकडून जे चार्ल्स याने 118 तर दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने 100 धावा करत शतकं ठोकलीय. क्विंटनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.
क्विंटन डी कॉकच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
दक्षिण आफ्रिकेकडून यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावलं. क्विंटन डी कॉकने 44 चेंडूत 100 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 8 षटकार मारले. याशिवाय रेझा हेन्रिक्सने अवघ्या 28 चेंडूत 68 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार इडन मार्करम 21 चेंडूत 38 धावा करून नाबाद माघारी परतला. मार्करम सध्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असून त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर रिले रुसोने 4 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. हेन्रिक क्लासेन 7 चेंडूत 16 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.
वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने शतक झळकावले
सामन्यात आधी फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 विकेट गमावत 258 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने शानदार शतक झळकावले. जॉन्सन चार्ल्सने 46 चेंडूत 118 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 11 षटकार मारले. तर कायली मेयर्सने 27 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी रोमेरी शेफर्डने 18 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेन पारनेलने २ बळी घेतले. या गोलंदाजाने 4 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. तर मार्को जॅनसेनने 4 षटकात 52 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. हा सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-1 अशी बरोबरी घेतली आहे. आता तिसरा आणि निर्णयाक टी20 सामना मंगळवारी 28 मार्च रोजी होणार आहे.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान झालेल्या टी 20 सामन्यात अनेक विक्रम झाले.. त्यावर एक नजर मारुयात...
- 259 धावांचा पाठलगा करत दक्षिण आफ्रिकेने टी 20 मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा रन चेस करण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम पीसीएलमधील Quetta Gladiators संघाच्या नावावर होता.
- आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकाने आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम याआधी वेस्ट इंडिजच्या नावावर होता. विंडिजमे 2021 मध्ये श्रीलंकाविरोधात सहा षटकात 98 धावा चोपल्या होत्या. दक्षिण आफ्रिकाने आज 102 धावांचा पाऊस पाडला.
- टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पडला. जवळपास 38 षटकात 400 पेक्षा जास्त धावा निघाल्या. याआधी हा विक्रम पीएसलमधील मुल्तान सुल्तान आणि Quetta Gladiators या सामन्यादरम्यान झाला होता.
- डिकॉकने अवघ्या 43 चेंडूत शतक झळकावले. हे दक्षिण आफ्रिकाकडून दुसरे वेगवान शतक होय. याआधी मिलरने 2017 मध्ये बांगलादेशविरोधात 35 चेंडूत शतक झळकावले होते.
- डिकॉकने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. हे डाव्या हाताचा विकेटकिपर फलंदाजाने झळकावलेले सर्वात वेगवान अर्धशतक होय.
- जोनसन चार्सने याने 39 चेंडूत शतक झळकावले. वेस्ट विडिंजकडून झळखावलेले सर्वात वेगवान शतक होय. याआधी हा विक्रम गेलच्या नावावर होता.
हे देखील वाचा-