WI vs BAN : 100 ओव्हरनंतर वेस्ट इंडिज- बांगलादेश मॅच ड्रॉ, वेस्ट इंडिजचा सुपर ओव्हरमध्ये 1 रननं विजय, मालिका बरोबरीत
WI vs BAN ODI: वेस्ट इंडिजनं दुसऱ्या वनडेत बांगलादेशला पराभूत केलं. सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजनं एका रननं बांगलादेशला पराभूत केलं.

ढाका : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजनं एका रननं विजय मिळवला. बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला 50 ओव्हरमध्ये 213 धावा करता आल्या. सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 10 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 9 धावा करु शकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांन एक एक सामना जिंकला आहे. तिसऱ्या वनडेत जो संघ विजयी होईल तो मालिका जिंकेल. या मॅचची आणखी एका कारणामुळं चर्चा झाली ते कारण म्हणजे वेस्ट इंडिजनं एका वेगवान गोलंदाजाकडून गोलंदाजी करुन घेतली नाही. वेस्ट इंडिजनं 50 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करुन घेतल्या.
वेस्ट इंडिजला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज होती आणि 2 विकेट हातात होत्या. सैफ हसन यानं पहिल्या चार बॉलमध्ये 2 धावा दिल्या. वेस्ट इंडिजला 2 बॉलमध्ये 3 धावा करायच्या होत्या. पाचव्या बॉलवर अकील हुसैन बाद झाला. यानंतर वेस्ट इंडिजला अखेरच्या बॉलवर तीन धावा करायच्या होत्या. वेस्ट इंडिजनं शेवटच्या बॉलवर 2 धावा केल्या. यामुळं मॅच ड्रॉ झाली आणि सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला.
सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय
सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी वेस्ट इंडिजनं केली. त्यांनी पहिल्या 5 बॉलवर वेस्ट इंडिजनं 6 धावा केल्या होत्या. अखेरच्या बॉलवर शाई होपनं चौकार मारला. त्यामुळं वेस्ट इंडिजनं एका ओव्हरमध्ये 10 धावा केल्या. यानंतर बांगलादेशचे फलंदाज सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आले. बांगलादेश सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या बॉलवर विजयासाठी 3 धावा केल्या होत्या. मात्र, सैफ हसन केवळ 1 रन करु शकला. त्यामुळं वेस्ट इंडिजनं सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या बॉलवर एका रनननं विजय मिळवला.
वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा गोलंदाजी करताना एकाही वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी दिली नाही. त्यांनी सर्वच्या सर्व 50 ओव्हरची गोलंदाजी फिरकीपटूंकडून करुन घेतली. मेन्स वनडेमध्ये ही पहिली वेळ आहे. एखाद्या टीममध्ये स्पिन गोलंदाजांनी 50 ओव्हर बॉलिंग केली.















