Why Harmanpreet Kaur Step Down Team India Captain : भारतीय महिला क्रिकेटमध्ये एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाला आहे. दीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत कौरने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडले आहे. मात्र, तिने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे आगामी काळात ती खेळाडू म्हणून भारतीय संघाचा भाग राहणार आहे. हरमनप्रीतच्या या निर्णयानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे. 

Continues below advertisement

एकदिवसीय विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कर्णधाराने अचानक नेतृत्वाची जबाबदारी का सोडली? दरम्यान, सोमवारी गुवाहाटी येथे बीसीसीआयची भारतीय महिला संघासोबत आढावा बैठक झाली. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हरमनप्रीतच्या कर्णधारपदाचे भवितव्य आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. टी-20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी, हरमनप्रीतचे वाढते वय आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी नवीन नेतृत्व तयार करण्याची गरज, ही त्यातील प्रमुख कारणं मानली जात आहेत.

गुवाहाटीतील आढावा बैठकीनंतर मोठा निर्णय

Continues below advertisement

बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीमध्ये बैठक घेतली. या बैठकीला हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार उपस्थित होते. या बैठकीत भारतीय महिला संघाचे भविष्यातील नियोजन, संघाची कामगिरी आणि नेतृत्व यावर चर्चा झाल्याचे मानले जाते. त्यानंतर हरमनप्रीतने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मात्र, हरमनप्रीतने स्वतःहून राजीनामा दिला की बीसीसीआयच्या चर्चेनंतर हा निर्णय झाला, याबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्टता नाही.

टी-20 विश्वचषकातील अपयश ठरलं निर्णायक?

हरमनप्रीतच्या नेतृत्वातील सर्वात मोठा प्रश्न टी-20 क्रिकेटमधील भारताची कामगिरी हा आहे. हरमनप्रीतने तब्बल पाच टी-20 विश्वचषकांमध्ये भारताचे नेतृत्व केले. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताला एकदाही टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही. 2020 मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली, तर 2018 आणि 2023 मध्ये संघाचा प्रवास उपांत्य फेरीत संपला. 2024 मध्ये भारत गट फेरीतून बाहेर पडला, तर 2026 मध्येही भारतीय संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवता आले नाही. एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी-20 विश्वचषकातही भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये नवीन विचार आणि नवीन नेतृत्वाची गरज आहे का? हा प्रश्न निवडकर्त्यांसमोर निर्माण झाला असण्याची शक्यता आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकही निर्णय बदलू शकले नाही

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला संघाने आशिया कपमध्येही दमदार कामगिरी केली आहे. मात्र, आशियाई स्पर्धांमधील यश आणि आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमधील यश यात मोठा फरक आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध सातत्याने विजय मिळवून विश्वचषक जिंकणे हे भारतीय संघापुढील मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता निवडकर्त्यांना आशियाई स्पर्धांपुरता नव्हे, तर जागतिक स्तरावर सातत्याने विजेतेपदासाठी लढणारा संघ तयार करण्याची गरज भासत असल्याचे मानले जात आहे.

2028 ऑलिम्पिकसाठी नवीन नेतृत्व तयार करण्याची तयारी?

क्रिकेटचा पुन्हा ऑलिम्पिकमध्ये समावेश होत आहे. त्यामुळे 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक भारतीय महिला संघासाठी मोठे लक्ष्य असणार आहे. ऑलिम्पिकला आता जवळपास दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे बीसीसीआयला नवीन कर्णधाराला पुरेसा वेळ देऊन संघाची नव्याने बांधणी करण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत स्मृती मंधानाकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली, तर तिला तरुण खेळाडूंना संघात स्थिरावण्यासाठी वेळ देता येईल आणि ऑलिम्पिकसाठी दीर्घकालीन रणनीती आखता येईल.

हरमनप्रीतचे वाढते वयही महत्त्वाचे

हरमनप्रीत कौर सध्या 37 वर्षांची आहे. मार्च 2027 मध्ये ती 38 वर्षांची होईल. पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तिचे वय जवळपास 40 वर्षे असेल. त्यामुळे भविष्यातील नेतृत्व तयार करण्याचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकते. मात्र, याचा अर्थ हरमनप्रीतची कारकीर्द संपली असा अजिबात नाही. तिने केवळ कर्णधारपद सोडले आहे. ती अद्याप कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू शकते. तिचा अनुभव नव्या कर्णधारासाठी आणि युवा खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

 हे ही वाचा -

Harmanpreet Kaur Marathi News: हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावूक पोस्ट करत म्हणाली, मला अनेकदा वैयक्तिक पातळीवर किंमत चुक