Kavya Maran Abrar Ahmed The Hundred : ‘द हंड्रेड’च्या (The Hundred) लिलावात सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अबरार अहमद (Abrar Ahmed) याला तब्बल 2.34 कोटी रुपयांना विकत घेतल्याने मोठी चर्चा रंगली आहे. मात्र या खरेदीनंतर फ्रँचायझी आणि तिची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी स्पष्ट सांगितले की हा विषय त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित फ्रँचायझीनेच घ्यावा लागेल.

‘द हंड्रेड’च्या काळातच पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा

मीडिया रिपोर्टनुसार, द हंड्रेडमध्ये अबरारच्या खेळण्यास आणखी एक अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण या स्पर्धेदरम्यानच पाकिस्तानचा वेस्ट इंडिज (Pakistan vs West Indies) दौरा ठरलेला आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2025–27 अंतर्गत दोन कसोटी सामन्यांची महत्त्वाची मालिका 15 जुलैपासून सुरू होऊन 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

NOC मिळणे ठरणार महत्त्वाचे

दरम्यान, द हंड्रेड स्पर्धेला 21 जुलैपासून सुरुवात होणार असून ती 16 ऑगस्टपर्यंत चालेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका सूत्रानुसार, त्याच काळात पाकिस्तान संघाची कसोटी मालिका असल्याने अबरारला या लीगमध्ये खेळता येण्याची शक्यता कमी आहे. जरी कसोटी संघात तो पहिल्या पसंतीचा स्पिनर नसला, तरी संघाला त्याच्या सेवांची गरज भासू शकते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून NOC (अनापत्ती प्रमाणपत्र) मिळणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

सनरायझर्स लीड्ससाठी मोठा धक्का ठरू शकतो

टीमचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितले होते की संघात आदिल रशीद याला घेता न आल्याने त्यांनी विदेशी स्पिनरचा पर्याय शोधायला सुरुवात केली. चार-पाच खेळाडूंच्या यादीत अबरारचाही समावेश होता आणि अखेरीस त्याची निवड करण्यात आली. पण जर त्याला NOC मिळाली नाही, तर हा सनरायझर्स लीड्ससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

खेळण्याची शक्यता 50-50

दुसरीकडे, काही जणांचे मत आहे की या स्पर्धेत मिळणाऱ्या मोठ्या रकमेचा विचार करता अबरारला NOC मिळण्याची शक्यता आहे. पीसीबीतील एका सूत्रानुसार, ही मोठी आर्थिक संधी आहे आणि अबरारच्या एजंटनेच त्याचे नाव लिलावात नोंदवले होते, म्हणजेच NOC मिळण्याची शक्यता गृहीत धरली गेली असावी. शिवाय अबरार हे सध्या पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याशी चांगले संबंध असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंमध्ये गणले जातात.

हे ही वाचा -

Team India World Cup 2027 : गिल OUT, रोहित-विराट ओपनिंग, ऋतुराज नंबर 3… 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा धक्कादायक फॉर्म्युला समोर