Abhishek Sharma Viral Video :भारतीय टी-20 क्रिकेटमधील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याचा आज 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि त्याचा मार्गदर्शक युवराज सिंगने अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. युवराजने सोशल मीडियावर शेअर केलेला एक मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युवराज सिंग अभिषेक शर्माचे कान धरून त्याच्याकडून चक्क उठक-बैठका करून घेताना दिसत आहे. एवढंच नाही, तर युवराजने अभिषेककडून चार मोठी वचनंही घेतली आहेत. अभिषेकची आक्रमक फलंदाजीची शैली पाहता युवराजने त्याला दिलेली ही शिक्षा चाहत्यांना विशेष पसंत पडत आहे.
अभिषेकने दिली चार वचनं
व्हिडीओमध्ये अभिषेक युवराजच्या सांगण्यावरून उठक-बैठका करताना दिसतो. त्याचवेळी तो आपल्या मार्गदर्शकाला चार वचनं देतो. पहिलं वचन म्हणजे, "मी पहिल्याच चेंडूवर षटकार मारणार नाही." दुसरं, "मी फलंदाजी करताना पुरेसा वेळ घेईन." तिसरं, "मी विचार करून धावा काढेन." तर चौथं आणि महत्त्वाचं वचन म्हणजे, "मी पहिल्या चेंडूवर उसळी आलेल्या चेंडूवर फटका मारणार नाही." अभिषेकच्या आक्रमक फलंदाजीला पाहता ही चारही वचनं युवराजने अगदी मजेशीर पद्धतीने घेतली आहेत. पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या अभिषेकला थोडं संयमाने खेळण्याचा सल्ला युवराजने या भन्नाट अंदाजात दिला आहे.
अमृतसरच्या अभिषेकला युवराजने घडवलं
अभिषेक शर्मा आणि युवराज सिंग यांचं नातं केवळ खेळाडू आणि मार्गदर्शकाचं नाही, तर गुरु-शिष्याचं आहे. पंजाबच्या अमृतसरमधून आलेल्या अभिषेकच्या क्रिकेट कारकीर्दीला योग्य दिशा देण्यात युवराजची मोठी भूमिका राहिली आहे. दोघेही डावखुरे आणि आक्रमक फलंदाज असल्याने अभिषेकच्या फलंदाजीतील क्षमता युवराजने जवळून ओळखली. 2018 मध्ये भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या अभिषेकने पुढे सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना आपल्या स्फोटक फलंदाजीने वेगळी ओळख निर्माण केली.
टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर
अभिषेक शर्मा सध्या भारतीय टी-20 संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याने टी-20 क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अभिषेकने 56 सामन्यांच्या 55 डावांमध्ये 1,629 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 187.25 इतका आहे. त्याच्या नावावर दोन शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. गोलंदाजीतही त्याने 10 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्येही अभिषेकचा धडाका कायम आहे. त्याने 92 सामन्यांमध्ये 2,378 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 171.21 आहे. त्याने आयपीएलमध्ये दोन शतकं आणि 13 अर्धशतकं झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 11 विकेट्सही आहेत.
हे ही वाचा -
