Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला धर्मशालाच्या मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंडच्या बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आर. अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासाठी हा अखेरचा कसोटी सामना खास आहे. कारण हा कसोटी त्याच्या करिअरमधील  100 वा सामना असेल. सामन्यापूर्वी बीसीसीआयकडून आर. अश्विन याचा विशेष सन्मान करण्यात आला. राहुल द्रविड याच्याकडून त्याला सन्मानित करण्यात आले.  राहुल द्रविडने अश्विनला खास कॅप दिली. यावेळी अश्विनची पत्नी आणि दोन मुली उपस्थित होत्या.


कोण आहे अश्विनची पत्नी ?


आर. अश्विन याला पत्नीने प्रत्येक टप्प्यात मानसिक साथ दिली. अनेकदा अश्विनचं मनोबल वाढवलं. आर. अश्विन यानं अनेक जाहीर कार्यक्रमात पत्नीचं कौतुक केलेय. आर. अश्विन याच्या पत्नीचं नाव प्रीति नारायण आहे. तिचा जन्म 26 मे 1988 रोजी तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये झाला. बी. टेक पर्यंत त्यांचं शिक्षण झालेय.


अश्विन आणि प्रीति नारायण यांचं लग्न 13 नोव्हेंबर 2011 मध्ये झालं. त्याआधीच काही दिवसांपूर्वी अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अश्विन आणि प्रीति यांनी चेन्नईच्या पद्मा शेषाधरी बाला भवन शाळेत एकत्र शिक्षण घेतलेय. त्यांची पहिली भेट शाळेतच झाली होती. 


अश्विनच्या पत्नी कोणताही व्यावसाय करत नाही अथवा वेगळ्या प्रोफेशनमध्ये नाही. त्या गृहिणी आहे. त्यांना अनेकदा स्टेडियममध्ये अश्विनला सपोर्ट करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. अश्विन आणि प्रीति यांना दोन मुली आहेत. एकीचं नाव अकिरा आहे, तिचा जन्म 2015 मध्ये झाला होता. तर दुसऱ्या मुलीचं नाव आध्या असं आहे.


10 व्या कसोटीसाठी अश्विनची पत्नी उपस्थित


धर्मशालाच्या मैदानात  अश्विन आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100वा सामना खेळण्यासाठी मैदानात आला. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याने अश्विनला 100 कसोटी सामने पूर्ण केल्यानिमित्त खास कॅप दिली गेली. यावेळी अश्विनचे कुटुंब मैदानात उपस्थित होते. त्याची पत्नी प्रीती आणि दोन्ही मुली अश्विनकडे पाहताना दिसल्या. या चौघांचा सोबतचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


100 कसोटी खेळणारा अश्विन 14 वा भारतीय खेळाडू - 


आर. अश्विन भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा  14वा खेळाडू ठरला. याआधी ही कामगिरी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीवीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, ईशांत शर्मा, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि विरेंद्र सेहवाग यांनी केली होती.