Who is Kushal Bhurtel Six Sixes in One Over : क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी अशा खेळी पाहायला मिळतात, ज्या वर्षानुवर्षे चाहत्यांच्या स्मरणात राहतात. नेपाळचा स्टार सलामीवीर कुशल भुर्तेल (Kushal Bhurtel) याने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष क्रिकेट पात्रता स्पर्धेत अशीच एक ऐतिहासिक खेळी साकारली. चीनविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात सलग 6 षटकार ठोकत अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावले आणि क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले.

6,6,6,6,6,6... एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार (Kushal Bhurtel Six Sixes in One Over)

सिंगापूर नॅशनल क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेपाळने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. डावाच्या सुरुवातीपासूनच कुशल भुर्तेल आक्रमक मूडमध्ये दिसत होता. चीनचा गोलंदाज चेन झुओ यूए याच्या एका षटकात भुर्तेलने सलग 6 चेंडूंवर 6 षटकार लगावत प्रेक्षकांना थक्क केले. त्या षटकात एक वाईड चेंडू टाकण्यात आला होता, मात्र त्याचा भुर्तेलच्या आक्रमकतेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने उर्वरित सहाही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहावा फलंदाज (Kushal Bhurtel News) 

या कामगिरीसह कुशल भुर्तेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा जगातील केवळ सहावा फलंदाज ठरला. त्याआधी हा पराक्रम हर्शल गिब्स, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, जसकरण मल्होत्रा ​​आणि दीपेंद्र सिंग आयरी यांनी केला होता. विशेष म्हणजे, नेपाळचा हा दुसरा फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला. यापूर्वी दीपेंद्र सिंह ऐरीने 2024 एसीसी प्रीमियर कपमध्ये कतारविरुद्ध हा पराक्रम गाजवला होता.

35 चेंडूत वादळी शतक (Kushal Bhurtel 35-ball century)

एका षटकात 36 धावा वसूल केल्यानंतर भुर्तेल थांबला नाही. त्याने चीनच्या गोलंदाजांवर चांगलाच समाचार घेतला आणि फक्त 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या धडाकेबाज खेळीत 12 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. हे त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. भुर्तेलच्या या स्फोटक खेळीमुळे नेपाळने सामन्यावर संपूर्ण वर्चस्व मिळवले आणि प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली ठेवले.

नेपाळ क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण

कुशल भुर्तेलच्या या विक्रमी खेळीमुळे नेपाळ क्रिकेटच्या नावावरही एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारे दोन वेगवेगळे फलंदाज असलेला नेपाळ हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. हा विक्रम नेपाळ क्रिकेटच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचे प्रतीक मानला जात आहे. कुशल भुर्तेलने केवळ स्वतःचे नाव विक्रमांच्या सुवर्णपानांमध्ये कोरले नाही, तर नेपाळ क्रिकेटला जागतिक स्तरावर नवी ओळखही मिळवून दिली आहे.  

हे ही वाचा -

Sachin Tendulkar on IPL rule : इम्पॅक्ट प्लेअर नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!