India Women Vs South Africa Women : महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी पावसाचे ढग दाटले आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा ऐतिहासिक सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याच मैदानावर भारताने सेमीफायनलमध्ये 7 वेळा विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पण आता या निर्णायक सामन्यापूर्वी हवामान विभागाने महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आयसीसीने या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवला आहे.

नवी मुंबईतील हवामानाचा अंदाज (Navi Mumbai Weather Forecast 2 November)

फायनल सामना रविवार 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. एक्युवेदरच्या अंदाजानुसार, त्या दिवशी पावसाची शक्यता सुमारे 63 टक्के आहे, तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत ही शक्यता 50 टक्क्यांपर्यंत राहील. याच मैदानावर भारत-बांगलादेशचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला होता. जर रविवारचा सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही, तर रिजर्व डे सोमवारी, 3 नोव्हेंबरला ठेवण्यात आला आहे. मात्र सोमवारीही नवी मुंबईत 55 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसामुळे फायनल रद्द झाल्यास काय होईल? (What If Rain Washes Out IND vs SA Women World Cup Final)

जर रविवारचा सामना पावसामुळे सुरूच झाला नाही किंवा अपूर्ण राहिला, तर सोमवारी तो तिथूनच पुढे खेळवला जाईल. प्रयत्न असेल की सामना पूर्ण 50-50 षटकांचा होईल. पण जर दोन्ही दिवस पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना संयुक्त विजेते (Joint Winners) घोषित करण्यात येईल.

इतिहासात पहिल्यांदाच नवीन विजेता 

यावेळी इतिहास घडणार आहे, कारण या दोन्ही संघांपैकी कुणीही अद्याप महिला वनडे वर्ल्ड कप जिंकलेला नाही. भारत तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेसाठी हा पहिलाच फायनल आहे. विशेष म्हणजे, महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यांपैकी एकही संघ नसलेला हा पहिलाच प्रसंग आहे.

हे ही वाचा -

Final Live Streaming : फ्री फ्री फ्री.... येथे फुकटात पाहू शकता भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम महामुकाबला, जाणून घ्या सविस्तर माहिती