West Indies beats Pakistan by 90 runs 1st Test : पाकिस्तानचा संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला आहे. या मालिकेत बाबर आझमकडे कसोटी फॉरमॅटचे नेतृत्व पुन्हा एकदा सोपवण्यात आले आहे. मात्र, कर्णधार म्हणून त्याचा हा नवा प्रवास अपेक्षेप्रमाणे सुरू होऊ शकला नाही. तरौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 90 धावांनी दणदणीत पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Continues below advertisement

पाकिस्तानची लाजीरवाणी कामगिरी (WI vs PAK 1st Test Update)

सामन्याच्या चौथ्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 211 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, दुसऱ्या डावात पाकिस्तानी फलंदाजांनी अत्यंत लाजीरवाणी कामगिरी केली आणि संपूर्ण संघ अवघ्या 120 धावांत गारद झाला. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत जायडन सील्सने चमकदार कामगिरी करत 14.2 षटकांत अवघ्या 20 धावा देऊन 5 बळी टिपले.

Continues below advertisement

पाकिस्तानचा परदेशातील सलग आठवा पराभव (Pakistan Test News)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) परदेशी भूमीवरील संघाची लाजीरवाणी कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने बाबर आझमकडे पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवले होते. परंतु, यामुळे संघाच्या कामगिरीत काही खास बदल दिसून आला नाही. पाकिस्तानने परदेशात शेवटचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जिंकला होता. त्यानंतर त्यांना परदेशी भूमीवर सलग 8 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. परदेशातील पाकिस्तानचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सलग पराभवांचा टप्पा ठरला आहे. दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजचा विचार केल्यास, गेल्या 11 कसोटी सामन्यांमधील त्यांचा हा केवळ दुसरा विजय आहे.

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील या कसोटी सामन्यात दोन्ही बाजूंच्या वेगवान गोलंदाजांचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळाले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त सहाव्यांदा असे घडले आहे की एकाच सामन्यातील सर्व 40 बळी वेगवान गोलंदाजांनी मिळवले आहेत. याशिवाय, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 20 बळी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

एकाच कसोटी सामन्यात सर्व 40 बळी वेगवान गोलंदाजांनी घेण्याच्या ऐतिहासिक नोंदी :

  • इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज – द ओव्हल (1984)
  • पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे – रावळपिंडी (1993)
  • इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – लीड्स (1998)
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – जोहान्सबर्ग (2018)
  • इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – लॉर्ड्स (2026)
  • वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान – तरौबा (2026)

हे ही वाचा -

India Coaching Staff News : एक-दोन नाही... तब्बल 10 कॅच सुटले! अखेर टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, फील्डिंग कोच बाहेर, आता नवा गुरु कोण?