India vs New Zealand 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच विराट कोहली वडोदऱ्यात दाखल झाला असून, विमानतळावर चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. या स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.

विराट कोहली काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळा चष्मा घालून दिसला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला घेरून थेट कारपर्यंत सुरक्षित नेले. चाहत्यांचा उत्साह इतका प्रचंड होता की प्रत्येकजण विराटची फक्त एक नजर पाहण्यासाठी कोहली-कोहलीच्या घोषणा देताना दिसत होता. विराटच्या आधी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी वडोदऱ्यात पोहोचला असून, उर्वरित खेळाडूही लवकरच येथे दाखल होण्याची शक्यता आहे.

विजय हजारे ट्रॉफी विराट कोहलीचा धमाका

भारतीय संघाचा स्टार फलंदाज असलेला विराट कोहली अलीकडेच दिल्ली संघाकडून खेळताना दिसला होता. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत त्याने अवघ्या दोन सामन्यांत 208 धावा केल्या. आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने दमदार 131 धावा, तर गुजरातविरुद्ध 77 धावा ठोकल्या. याच दरम्यान विराटने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा टप्पा पार केला. सर्वात जलद 16 हजार लिस्ट-ए धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.

शानदार फॉर्ममध्ये विराट कोहली 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. पहिल्या दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला असला, तरी त्यानंतर त्याच्या बॅटने पुन्हा एकदा रन्सचा पाऊस पाडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतकाच्या जोरावर एकूण 302 धावा केल्या. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीतही फक्त दोन सामन्यांत 208 धावा करून त्याने आपला फॉर्म कायम राखला.

विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून केवळ 25 धावा दूर आहे. हा ऐतिहासिक टप्पा पार करताच तो सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्या पाठोपाठ हा विक्रम करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ (India's ODI squad against New Zealand) -  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.

हे ही वाचा -

T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!