ॲडिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे पर्थमध्ये पार पडली. या वनडेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी 7 महिन्यानंतर टीम इंडियातर्फे मैदानात पाऊल ठेवलं. मात्र, पर्थमध्ये रोहित शर्मा 8 धावा तर विराट कोहली शुन्याव बाद झाला. आता दुसरी मॅच ॲडिलेड मध्ये होणार आहे. दुसरा सामना गुरुवारी 23 ऑक्टोबरला होईल. ॲडिलेडमध्ये विराट कोहलीचं रेकॉर्ड दमदार आहे. विराटनं या मैदानावर कसोटी , वनडे आणि टी 20 मध्ये दमदार फलंदाजी केली आहे. विराटनं या मैदानावर एकूण 975 धावा केल्या आहेत.
विराट कोहली टी 20 आणि कसोटीमधून निवृत्त झाला आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये विराट कोहलीनं ॲडिलेडमध्ये केलेली कामगिरी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची झोप उडवण्यास पुरेशी आहे. विराटनं या मैदानावर खेळलेल्या टी 20 च्या तीन डावात 204 धावा केल्या आहेत. या तीन डावात तीन अर्धशतकं केली आहेत. कसोटीचा विचार केला तर ॲडिलेडमध्ये त्याची सरासरी 52.7 आहे. कसोटीत विराटनं या मैदानावर 527 धावा केल्या आहेत. ॲडिलेडमध्ये विराट कोहलीनं वनडेमध्ये 4 मॅचमध्ये 244 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 61 इतकी आहे.
Virat Kohli : किंग कोहली ॲडिलेडचा राजा
विराट कोहीलनं टी 20, कसोटी आणि वनडे मिळून ॲडिलेडच्या मैदानावर 17 डावात एकूण 65 च्या सरासरीनं 975 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची टीम विराट कोहलीचा धसका यासाठी घेऊ शकते. कारण विराटनं या मैदानावर 5 शतक आणि चार अर्धशतकं केली आहेत.
विराट कोहलीनं या मैदानात शेवटच्या दोन वनडे मॅचमध्ये शतक केलं आहे. विराट कोहली ॲडिलेडच्या मैदानावर धावा करण्याच्या बाबतीत डॉन ब्रॅडमन, स्टीव स्मिथ, ॲडम गिलख्रिस्ट या दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या पुढं आहे. टी 20 आणि वनडे मध्ये विराट कोहलीनं या ठिकाणी धावांचा पाऊस पाडला आहे. त्यानं 7 डावात 89 च्या सरासरीनं 448 धावा केल्या आहेत.
दरम्यान, भारताला मालिका जिंकायची असल्यास दुसरी वनडे मॅच जिंकणं आवश्यक आहे. दुसऱ्या वनडेत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याची भारताला संधी आहे. भारताच्या टीममध्ये शुभमन गिल काय बदल करणार ते पाहावं लागेल.
भारताचा संघ : शुभमन गिल (कॅप्टन ), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकॅप्टन), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल