Virat Kohli And Gautam Gambhir News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टी-20 मालिकेत भारताला इंग्लंडकडून 0-4 अशा लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष वनडे मालिकेकडे लागले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, पहिल्या वनडेपूर्वीच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. इंग्लंडमधून समोर आलेल्या काही सराव सत्रातील फोटोमुळे विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही सुरळीत नसल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

Continues below advertisement

बर्मिंगहॅममधील सराव सत्र ठरलं चर्चेचा विषय

वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानावर अधिकृत सराव सत्र घेतले. मालिकेपूर्वीचे हे एकमेव अधिकृत सराव सत्र होते. त्याआधी दोन दिवस अनौपचारिक सराव झाला होता. त्या सरावात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू सहभागी झाले होते. सरावादरम्यान विराट कोहली आणि भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल यांच्यात बराच वेळ चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये संघरचना, आगामी वनडे विश्वचषक, संघातील संयोजन आणि भविष्यातील योजना यासारख्या विषयांवर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement

गंभीर सर्वांशी बोलला... पण विराटशी नाही?

सरावादरम्यान विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा सराव केला आणि त्यानंतर जवळपास 30 ते 40 मिनिटे नेट्समध्ये फलंदाजी केली. फलंदाजी पूर्ण झाल्यानंतर तो नेट्सबाहेर आला. यावेळी नेहमीप्रमाणे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर विराटशी चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्याऐवजी फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक हे विराटकडे गेले आणि दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर कोटक थेट गौतम गंभीर यांच्याकडे गेले आणि त्यांनी विराटसोबत झालेल्या संवादाची माहिती गंभीर यांना दिल्यासारखे दृश्य पाहायला मिळाले. त्यानंतर विराट सराव आटोपून मैदानातून निघून गेला.

मतभेद आहेत का? अधिकृत दुजोरा नाही

सरावादरम्यान गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा, शुभमन गिल, गुरनूर ब्रारसह जवळपास सर्व खेळाडूंशी संवाद साधला. मात्र विराट नेट्समध्ये असताना गंभीर त्याच्याकडे गेले नाहीत किंवा दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या दृश्यांमुळे विराट आणि गंभीर यांच्यातील नातेसंबंधांबाबत पुन्हा तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. मात्र, या फोटोच्या आधारे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात मतभेद आहेत, असा कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही. दोघांमध्ये संवाद झाला नसल्याचे दिसले असले तरी त्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पण, याआधी मैदानावरील वाद आणि दोघांमधील तणावपूर्ण प्रसंगांमुळे अशा चर्चांना नेहमीच खतपाणी मिळत आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात या फोटोची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा -

BBL 2026-27 Schedule : तारीख 12 डिसेंबर... मैदान चेन्नई! क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा ऑस्ट्रेलियाचा प्लॅन रेडी; बिग बॅश लीगच्या Scheduleची घोषणा