Virat Kohli Retirement From Test Cricket News : भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण, रोहित शर्माच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील.
अँग्री यंग मॅन म्हणून मैदान गाजवलं, पण कसोटीचं मैदान सोडताना कोहली हळवा झाला! ( Virat Kohli Retirement Instagram Post)
कसोटीचं मैदान सोडताना कोहली हळवा झाला, तो म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ (भारताची टोपी) प्रथमच परिधान करून आज 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या.
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट आहे. हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो. या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाही, पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त; अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिलंय.
मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय, माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे
मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहीन!
बीसीसीआय आता काय करणार?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियासमोर आता या दोन दिग्गज खेळाडूंची जागा कोण घेणार याचे मोठे आव्हान आहे. याशिवाय, बीसीसीआयला आता रोहित शर्मा तसेच विराट कोहलीसाठी पर्याय शोधावा लागेल.
गौरवशाली कसोटी कारकिर्दीचा अंत!
विराट कोहली निवृत्त होताच त्याच्या 14 वर्षांच्या गौरवशाली कसोटी कारकिर्दीचा अंत झाला. या काळात त्याने 123 कसोटी सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 30 शतकांसह 9,230 धावा केल्या आहेत. तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार देखील आहे, त्याने 68 पैकी 40 कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.
