Virat Kohli And Rohit Sharma : धरमशालाच्या मैदानावर भारताने किवीचा पराभव करत 20 वर्षांचा दुष्काळ संपवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे या विजयात मोठं योगदान होतं. शामीने पाच विकेट घेत न्यूझीलंडला 273 धावांत रोखले होते. त्यानंतर रोहित शर्माने वेगावान सुरुवात करुन दिली. तर विराट कोहलीने 95 धावांची मॅच विनिंग खेळी केली. या विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. भारतीय संघाचे दोन सिनिअर खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये वाद असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या होत्या. दोघांनी सोशल मीडियावर एकमेंकांना अनफॉलो केले अशाही चर्चा रंगल्या होत्या. पण या दोन्ही खेळाडूमध्ये चांगली मैत्री असल्याचे विश्वचषकात दिसत आहे. मैदानावरही दोघेही एकमेकांचा सल्ला घेत आहेत. रोहित शर्माला मैदानात जेव्हा जेव्हा गरज पडते, विराट कोहली सल्ला देण्यासाठी पुढे येतो. दोन दिग्गज खेळाडूंमध्ये वाद असल्याच्या सर्व बातम्या यावर खोट्या असल्याचे समजतेय. रविवारी न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर रोहित आणि विराट यांनी एकाच गाडीमधून प्रवास केलाय.
पाहा व्हिडीओ
सर्वाधिक धावा विराटच्या नावावर -
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. पाच सामन्यात विराट कोहलीने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. विराट कोहलीने पाच सामन्यात 118 च्या सरासरीने 354 धावा चोपल्या आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5 सामन्यात 62.20 च्या सरासरीने 311 धावा चोपल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान आहे. त्याने 294 धावा केल्या आहेत. रचित रविंद्र आणि ड्ररेल मिचेल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावावर अनुक्रमे 290 आणि 268 धावा आहेत.
भारताचा न्यूझीलंडवर विजय
IND Vs NZ, Match Highlights : विराट कोहलीच्या 95 धावांच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव केला. न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचे आव्हान भारताने सहा विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. विराट कोहलीने 95, रोहित शर्माने 46, श्रेयस अय्यरने 33 आणि रविंद्र जाडेजाने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. यंदाच्या विश्वचषकातील भारताचा हा सलग पाचवा विजय होय. न्यूझीलंडचा विजयरथ भारताने थांबवला आहे. आता गुणतालिकेत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या विजयासह भारताने सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.