Virat Kohli And Rohit Sharma World Cup 2027 Update : पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज झहीर अब्बास (Zaheer Abbas) यांनी भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. रोहित आणि विराटमध्ये अजून खूप क्रिकेट बाकी असून त्यांनी 2027 चा एकदिवसीय (ODI) वर्ल्ड कप खेळला पाहिजे, असा विश्वास झहीर अब्बास यांनी व्यक्त केला आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. या दोन्ही खेळाडूंचं मुख्य ध्येय भारताला 2027 चा वर्ल्ड कप जिंकवून देणं हेच आहे.
"वय हा अडसर ठरू शकत नाही..."
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलशी बोलताना झहीर अब्बास यांनी स्पष्ट केलं की, रोहित आणि विराट हे आजही जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. झहीर अब्बास म्हणाले, "या दोन्ही खेळाडूंच्या कौशल्याला तोड नाही. त्यांच्या अफाट अनुभवाचा विचार करता, त्यांना 2027 च्या विश्वचषक संघातून बाहेर ठेवण्याचं कोणतंही कारण दिसत नाही."
"जर दोन्ही खेळाडू पूर्णपणे फिट असतील आणि सातत्याने धावा करत असतील, तर वय हा त्यांच्या मार्गात अडसर ठरू नये," असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. तसेच दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या आगामी 2027 च्या विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंच्या अनुभवाचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक
रोहित शर्माच्या फलंदाजीचा उल्लेख करताना झहीर अब्बास यांनी त्याच्या क्लासचे कौतुक केले. ते म्हणाले, "मी रोहितला इंग्लंडमध्ये शतक झळकावताना पाहिलं आहे. त्याची फलंदाजी पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. अत्यंत सहजतेने आणि अप्रतिम टायमिंगसह तो फटकेबाजी करतो."
बाबर आझमकडून पाकिस्तानला अपेक्षा
पाकिस्तानी चाहत्यांना आपल्या संघाला पाठिंबा देण्याचं आवाहन करताना त्यांनी बाबर आझमबद्दलही भाष्य केलं. बाबर आझमने कसोटी कर्णधार म्हणून पुनरागमन केल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "बाबर हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. एकदा त्याने धावा करायला सुरुवात केली की, त्याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण पाकिस्तान संघावर दिसेल आणि पाकिस्तान क्रिकेटचे चांगले दिवस परत येतील," असे ते म्हणाले.
हे ही वाचा -
