IND-U19 vs ENG-U19 : एकीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. दुसरीकडे भारताची अंडर 19 टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारताचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीनं चौथ्या एकदिवसीय मॅचमध्ये पहिलं शतक पूर्ण केलं. या मालिकेतील त्याचं हे पहिलं शतक ठरलं. अंडर 19 क्रिकेटमध्ये चौथा एकदिवसीय सामना खेळताना वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. आक्रमक फलंदाजी करत त्यानं आपलं शतक पूर्ण केलं.
वैभवचं 52 धावांमध्ये शतक
इंग्लंड विरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात वैभव सूर्यवंशीनं 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर शतकापर्यंत पोहोचण्यासाठी रिषभ पंतला आणखी 28 बॉल लागले. वैभव सूर्यवंशीनं 52 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वैभवनं 8 षटकार आणि 10 चौकार मारत शतक पूर्ण केलं. अंडर 19 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक पूर्ण करण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर नोंदवला गेला आहे.
वैभव सूर्यवंशी तिसऱ्या वनडे मॅचमध्ये 86 धावांवर बाद झाला होता. तिसऱ्या मॅचमध्ये त्याचं शतक 14 धावांनी हुकलं होतं. चौथ्या मॅचमध्ये वैभवनं ती कमी भरुन काढली. 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं या मॅचमध्ये 78 बॉलमध्ये 143 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं 10 षटकार आणि 13 चौकार मारले. या डावात वैभवचं स्ट्राइक रेट 183.33 इतकं आहे.
वैभव सूर्यवंशीनं दुसऱ्या विकेटसाठी विहान मल्होत्रासोबत 219 धावांची भागीदारी केली. यामुळं भारत मजबूत स्थितीत पोहोचला. वैभवनं 143 पैकी 112 धावा चौकार आणि षटकारांच्या जोरावर काढल्या. वैभवनं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. वैभव सूर्यवंशीनं पहिल्या मॅचमध्ये 19 बॉलमध्ये 48 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 34 बॉलमध्ये 45 धावा, तर तिसऱ्या वनडेत 31 बॉलमध्ये 86 धावा केल्या होत्या. आता, चौथ्या मॅचमध्ये सूर्यवंशीनं 78 बॉलमध्ये 143 धावा केल्या.
विहान मल्होत्रानं देखील शतक केलं आहे. त्यानं 116 बॉलमध्ये 117 धावा केल्या आहेत. तो अजूनही फलंदाजी करत आहे. त्यानं 14 षटकार आणि 2 चौकार मारले आहेत. सध्या भारताच्या 41 ओव्हरमध्ये 4 बाद 313 धावा केल्या आहेत.
चौथ्या वनडेसाठी भारताचा संघ
आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, राहुल कुमार, हरवंश पंगालिया, अभिज्ञान कुंडू, कनिष्क चौहान, आरएस अंबरीश, दीपेश देवेंद्रन, युधाजीत गुहा, नमन पुष्पक