UP T20 League Rinku Singh : रिंकू सिंगच्या नेतृत्वाखाली मेरठ मेव्हरिक्सने यूपी टी-20 लीग 2026 च्या विजेतेपदावर पुन्हा एकदा नाव कोरलं. अंतिम सामन्यात मेरठ मेव्हरिक्सने भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील लखनऊ फाल्कन्सचा तब्बल 94 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या सामन्यात रिंकूची कर्णधार म्हणून छाप पडलीच, पण त्याचा मैदानावरील अवतारही पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान मेरठचा फलंदाज दिव्यांश राजपूत खराब शॉट खेळून बाद झाला. दिव्यांशने 12 चेंडूत 13 धावा केल्या. मात्र, त्याच्या बाद होण्याची पद्धत कर्णधार रिंकू सिंगला अजिबात पसंत पडली नाही. दिव्यांश बाद होऊन डगआउटमध्ये परतल्यानंतर रिंकू सिंगने त्याची चांगलीच कानउघाडणी केली. कॅमेऱ्यात रिंकूचा हा संताप स्पष्टपणे कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खराब शॉटमुळे विकेट गमावल्याबद्दल रिंकूने दिव्यांशला जाब विचारल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

Continues below advertisement

मेरठचा दणदणीत विजय

अंतिम सामन्यात मेरठ मेव्हरिक्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 203 धावा उभारल्या. मेरठच्या डावाचा हिरो ठरला तो दिव्यांश जोशी. त्याने अवघ्या 40 चेंडूत धडाकेबाज 105 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले. मेरठचा कर्णधार रिंकू सिंह मात्र या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो अवघ्या 1 धावेवर बाद झाला. दिव्यांश जोशीनंतर ऋतुराज शर्मा हा मेरठकडून दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 24 धावा केल्या. स्वास्तिक चिकारा 18, अक्षय दुबे 15, तर यश गर्गने नाबाद 16 धावा केल्या.

Continues below advertisement

लखनऊचे फलंदाजी नापास

204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ फाल्कन्सचा डाव पूर्णपणे ढेपाळला. भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील लखनऊचा संघ अवघ्या 16 षटकांत 106 धावांवर ऑलआऊट झाला. लखनऊकडून अजीत वर्माने 24 चेंडूत 39 धावा करत सर्वाधिक प्रतिकार केला. कृतज्ञ कुमार सिंहने 21, तर मोहम्मद सैफने 10 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त लखनऊच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मेरठच्या गोलंदाजीत विशाल चौधरीने भेदक मारा करत 4 षटकांत केवळ 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. जीशान अन्सारीने दोन विकेट्स घेतल्या, तर करण चौधरी, विजय कुमार आणि यश गर्ग यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

हे ही वाचा -

गिलचा धुडगूस अन् अर्शदीपची केली धुलाई! टीम इंडियाचे दोन स्टार आमनेसामने, मोहालीत नेमकं काय घडलं?