India vs Pakistan U19 World Cup 2026 : अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 1 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या हायव्होल्टेज लढतीसाठी दोन्ही संघांची तयारी जोरात सुरू असतानाच पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तान संघाचा विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद शायन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट व्यवस्थापनाने त्याच्या बदल्याची घोषणा केली असून अब्दुल कादिर याला संघात संधी देण्यात आली आहे.
विश्वचषकात पहिल्यांदाच होणार भारत–पाक आमना-सामना
या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघ अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भिडले होते, जिथे पाकिस्तानने भारतावर मात करत विजेतेपद पटकावले होते. रविवारच्या महामुकाबल्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून विकेटकीपर मोहम्मद शायन संपूर्ण विश्वचषकातून बाहेर झाला आहे. सराव सत्रादरम्यान त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. स्कॅननंतर नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले.
ICC कडून रिप्लेसमेंटला मंजुरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोहम्मद शायनच्या जागी अब्दुल कादिर याला संघात समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे. नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे शायनला स्पर्धेबाहेर काढण्यात आले असून, त्याच्या जागी अब्दुल कादिर पाकिस्तान संघात दाखल झाला आहे. ही दुखापत शायनला संघाच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान झाली होती.
भारत–पाक सामना ठरवणार चौथा सेमीफायनलिस्ट
अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हा सामना थेट नॉकआउट स्वरूपाचा असून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. आतापर्यंत तीन संघांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. शुक्रवारी अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. ग्रुप बी मधून इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला, तर अफगाणिस्तानने आयर्लंडचा 191 धावांनी पराभव करत अंतिम चारमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली आहे.
हे ही वाचा -
