RCB vs MI IPL 2026 Turning Point Tilak Varma catch : पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचं यंदाच्या हंगामातील आव्हान अखेर संपुष्टात आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध झालेल्या थरारक सामन्यात अंतिम चेंडूवर 2 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागल्याने मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडली. रायपूर येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 54 व्या सामन्यात गतविजेत्या आरसीबीने शेवटच्या क्षणी सामना हिसकावून घेतला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 166 धावांचा स्कोर उभारला होता. लक्ष्याचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जबरदस्त मारा केला आणि सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला होता. मात्र, तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्यातील एका गैरसमजामुळे सामना मुंबईच्या हातातून निसटला.
सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट
सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला तो 18 व्या षटकातील प्रसंग. आरसीबीसाठी एकहाती झुंज देत असलेल्या क्रुणाल पांड्याने अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवर हवेत फटका मारला. सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या नमन धीरने अप्रतिम प्रयत्न करत चेंडू सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वी मैदानात ढकलला. त्याच्या अगदी जवळ तिलक वर्मा उभा होता. मात्र, नमनचा पाय बाउंड्री रोपला लागला असावा, असा समज झाल्याने तिलकने चेंडू पकडण्याचा प्रयत्नच केला नाही.
प्रत्यक्ष रिप्लेमध्ये मात्र नमनचा पाय रोपला स्पर्श झालाच नव्हता, हे स्पष्ट झालं. म्हणजेच तो झेल पूर्ण होऊ शकला असता आणि सेट झालेला क्रुणाल पांड्या बाद झाला असता. या गैरसमजामुळे नमन धीरही संतापलेला दिसला.
जीवदान मिळाल्यानंतर क्रुणाल पांड्याने त्याच षटकात अल्लाह गझनफरला सलग दोन षटकार ठोकले. हीच 12 धावांची भर मुंबईसाठी निर्णायक ठरली. नंतर तिलक वर्माने क्रुणालचा शानदार झेल घेतला खरा, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
शेवटच्या षटकात नो-बॉलसह तब्बल 5 अतिरिक्त धावा
शेवटच्या षटकात मुंबईसमोर 15 धावा वाचवण्याचं आव्हान होतं. मात्र, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अंतिम षटक टाकणाऱ्या राज अंगद बावाला दबाव झेपला नाही. त्याने वाइड आणि नो-बॉलसह तब्बल 5 अतिरिक्त धावा दिल्या. अखेरच्या चेंडूवर रासिख सलामने धाव घेत आरसीबीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. जर तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्यात तो गैरसमज झाला नसता, तर क्रुणाल पांड्या त्याचवेळी बाद झाला असता आणि आरसीबीसमोर शेवटच्या षटकात 15 नव्हे तर जवळपास 25 धावांचं कठीण लक्ष्य उभं राहिलं असतं.
हे ही वाचा -
