Women’s World Cup 2025 Semifinal Scenario Team India : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पहिली सेमीफायनलिस्ट टीम निश्चित झाली आहे. सात वेळा विजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia Qualify Womens World Cup 2025 Semifinal) संघाने सलग पाच सामने जिंकत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. पॉइंट्स टेबलवर त्यांच्या नावासमोर आता “Q" म्हणजेच पात्र लिहिले गेले आहे. मात्र, यामुळे उरलेल्या 3 जागांसाठी चढाओढ सुरू झाली आहे, ज्यामध्ये टीम इंडियासाठी गणित गुंतागुंतीचं झालं आहे.
ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये, तर....
पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे आणि त्यांचा सेमीफायनल प्रवास निश्चित झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून, त्यांना उरलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एक विजय मिळवला तरी सेमीफायनलची तिकिटं मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण आफ्रिका, ज्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे सहा गुण झाले आहेत. भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियासाठी समीकरण झालं गुंतागुंतीचं
भारतीय संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आणि दोन हरले आहेत. आता टीम इंडियासमोर इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे तीन सामने उरले आहेत. 19 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताची सेमीफायनलची आशा धोक्यात येऊ शकते.
दक्षिण आफ्रिका अन् इंग्लंडची जागा जवळपास पक्की
दक्षिण आफ्रिकेला अजून श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी खेळायचे आहे. या तिन्हीपैकी फक्त एक सामना जिंकला तरी ते अंतिम चारमध्ये पोहोचतील. इंग्लंडलाही फक्त एका विजयाची गरज आहे, त्यांचे उरलेले सामने भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे.
भारतासाठी आता ‘करो या मरो’ परिस्थिति, न्यूझीलंडचा धोका का?
भारताला उरलेले तीनपैकी दोन सामने जिंकणे अत्यावश्यक आहे, विशेषतः इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध. न्यूझीलंडच भारतासाठी सगळ्यात मोठा धोका ठरू शकतो. न्यूझीलंडने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. एक जिंकला, दोन हरले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांचे 3 गुण आहेत. आता त्यांचे उरलेले सामने पाकिस्तान, भारत आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. जर न्यूझीलंडने उरलेले तिन्ही सामने जिंकले, किंवा भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड दोघांविरुद्ध पराभव पत्करला, तर भारताला सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडावे लागू शकते. म्हणून भारताला केवळ स्वतःचे सामने जिंकणेच नाही, तर न्यूझीलंड हरावा अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे.
हे ही वाचा -